Babanrao Dhakne : अन् 'त्या' दिवशी भगवानगडावर झाला नेतृत्वबदल.. ढाकणे विरुद्ध मुंडे; असा पेटला टोकाचा संघर्ष

Babanrao Dhakne Vs Gopinath Munde
Babanrao Dhakne Vs Gopinath Mundeesakal

पुणेः माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं शुक्रवारी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. एकेकाळी वंजारी समाजाचं आणि ऊसतोड कामागारांचं नेतृत्व निर्विवादपणे बबनराव ढाकणेंकडे होतं. त्यानंतर नव्या दमाचे गोपीनाथराव मुंडे पुढे आले आणि त्यांनी बबनरावांचं राजकीय वस्त्रहरण केलं. ऊसतोड कामगार आणि भगवानगडाभोवतीच्या राजकारणावर स्व. गोपीनाथराव मुंडेंनी कसं वर्चस्व मिळवलं, ते पाहूया.

बबनराव ढाकणेंचं मूळ गाव अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातलं अकोले. शेतकरी कुटुंबातून येऊन केंद्रीय मंत्रिपदापर्यंत त्यांनी मजल मारली. अगदी शालेय जीवनापासून ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते. १९५७ मध्ये त्यांनी गोवा मुक्ती संग्राममध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर १९६७ मध्ये ते पाहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले.

पुढे १९७८ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी पाथर्डी विधानसभा मतदारंसंघातून निवडणूक लढवली. या विजयासह तब्बल चारवेळा ते विधानसभेत गेले. राज्याचे बांधकाम राज्यमंत्री, ग्रामविकास मंत्री पुढे बीड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

Babanrao Dhakne Vs Gopinath Munde
Sharad Pawar on Manoj jarange: "मनोज जरांगेंनी सरकारला वेळ दिला पण..."; शरद पवार यांची स्पष्ट भूमिका

ऊसतोड कामगार आणि वंजारी समाजाचे नेते म्हणून बबनराव ढाकणेंची ओळख होती. विजेच्या प्रश्नासाठी विधानसभेच्या गॅलरीतून त्यांनी खाली उडी घेतली होती, ते आंदोलन खूपच गाजलं. कुठल्याही प्रश्नावर आक्रमकपणे आणि अभ्यासपूर्ण मांडणी करुन विषय तडीस नेणं, ही त्यांची ख्याती.

बीडमध्ये स्व. केशरकाकू क्षीरसागर यांचा पराभव केल्याने बबनरावांची देशभर ख्याती पसरली. वंजारी समाजाचे पहिले राज्यमंत्री, पहिले कॅबिनेट मंत्री, पहिले खासदार, पहिले केंद्रीय मंत्री, पहिले विरोधी पक्षनेते (दोन्ही सभागृह), पहिले उपसभापती; असं एक वेगळं रेकॉर्ड बबनराव ढाकणेंच्या नावावर आहे.

स्व. गोपीनाथराव मुंडे आणि स्व. बबनराव ढाकणे यांच्यासोबत काम केलेले काँग्रेस नेते दादासाहेब मुंडे सांगतात, बबनराव ढाकणे एक तत्त्वनिष्ठ नेते होते.

१९९९ साली वयाच्या ६५व्या वर्षी त्यांनी स्वतः राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. पुढे २००४च्या विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या मुलाच्या प्रचारातही ते उतरले नाहीत. तेव्हा त्यांनी प्रचार केला असता तर प्रतापराव ढाकणे निवडून आले असते.

भगवानगड आणि बबनराव ढाकणे

१९५१ सालापासून अहमदनगरच्या भगवानगडावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरु झाली. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी ही परंपरा सुरु केल्याचं सांगितलं जातं. पुढे १९७२च्या दरम्यान जेव्हा ऊसतोड कामगारांचं संघटन मजबूत होत गेलं तेव्हा दसऱ्याला गडावर एकत्र येण्याची एक वेगळी परंपरा सुरु झाली.

बबनराव ढाकणे ऊसतोड कामगारांशी संवाद साधायचे. तेव्हा ते पाथर्डीतून आमदार झाले होते आणि परिसरात त्यांचं वर्चस्व निर्माण होत होतं. तेव्हाचे गडाचे महंत भिमसिंह बाबा आणि बबनरावांचे संबध सलोख्याचे होते. त्यामुळे बबनरावांनी पुढे २० वर्षे गडावर दसरा मेळावा चालवला.

१९९३ साली जेव्हा स्व. गोपीनाथराव मुंडे यांचं प्रस्थ वंजारी समाजामध्ये आणि ऊसतोड कामगारांमध्ये वाढत होतं, तेव्हा एक मोठी घडमोड घडण्याच्या प्रतीक्षेत होती. वंजारा समाजातल्या तरूणतुर्कांनी भगवान सेना स्थापन केली होती.

यामध्ये मुरलीधर ढाकणे, दादासाहेब मुंडे, राजेंद्र गर्जे, बाळासाहेब नागरे, अशोक घुगे, सर्जेराव तांदेळ, अनुरथ सानप, चंद्रकांत सानप, सुरेश सानप या नेत्यांचा समावेश होता. अॅड. देवराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचं काम सुरु होतं. मूळची ही विद्यार्थी संघटना पुढे राजकीय संघटना बनत होती.

Babanrao Dhakne Vs Gopinath Munde
Maharashtra: राज्यातील 'या' महापालिकेची झाली तब्बल २७ वर्षानंतर भंगारातून मुक्ती !

१९९३ साली गोपीनाथराव मुंडे राज्यात विरोधी पक्षनेते होते. तेव्हा भगवान सेनेने त्यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. बबनराव ढाकणे शरद पवारांचे समर्थक आहेत, या सबबीखाली भगवान सेनेने ढाकणेंना जाहीर विरोध केला.

९३च्या दसरा मेळाव्यात बबनराव ढाकणे यांना बोलू दिलं नाही. त्यांना अपमानास्पदरित्या गडावरुन उतरावं लागलं होतं. तेव्हापासून भगवान गडावर गोपीनाथ मुंडेंनी वर्चस्व प्रस्थापित केलं.

आरक्षणावरुनही संघर्ष

ओबीसीमध्ये असलेल्या वंजारा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा मुद्दा १९९२-९३ साली चर्चेत आला होता. गणपतराव सणके नावाचे एक मंत्रालयीन कर्मचारी होते. त्यांनी वंजारा आणि बंजारा समकक्ष असल्याचे पुरावे गोळा केले.

सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने राज्य सरकारवर जबाबदारी टाकत निर्णय घेण्याचे अधिकार दिले. त्याच आधारावर आरक्षणाच्या हालचाली सुरु झाल्या. ही बाब गोपीनाथराव मुंडेंनी ओळखली. त्यासाठी त्यांनी राज्याच्या विविध भागात बैठका घ्यायला सुरुवात केली आणि आरक्षणाच्या बाजूने लढा उभा केला.

बबनराव ढाकणे यांचा मात्र अशा आरक्षणाला विरोध होता. परंतु स्कॉलरशीपचा मुद्दा उपस्थित करुन मुंडेंनी मुद्दा रेटत नेला. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी मुंडेंना बळ द्यायचं म्हणून ही मागणी मान्य केली.

वंजारा समाजाचा भलेही 'एनटी'मध्ये समावेश झालेला असला तरी पुढे शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर या प्रवर्गाचं चार भागांमध्ये विभाजन केलं. वंजारा समाजासाठी स्वतंत्र एनटी (डी) हा प्रवर्ग तयार झाला.

ऊसतोड कामगार संघटना गोपीनाथरावांनी घेतली ताब्यात

वंजारी समाजासह ऊसतोड कामगारांचे नेते बबनरावच होते. स्व. गोपीनाथराव मुंडेंनी या संघटनेत वर्चस्व प्रस्थापित केलं. तेव्हा बीडच्या कपिलधार येथे ऊसतोड कामगारांचा एक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्याला मुंडेंनी कामगारांच्या मुकदमांना संघटीत केलेलं होतं.

१९९६ साल, मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री होते तर केशवराव आंधळे हे ढाकणेंच्या मुकादम संघटनेचे प्रमुख. महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मजूर-मुकादम वाहतूकदार संघटना, असं त्या संघटनेचं नाव.

तेव्हा मेळाव्यात केशवराव आंधळे यांनी बबनरावांची संघटना मुंडेंच्या संघटनेत विलीन करत असल्याची घोषणा केली. बबनरावांच्या समोरच्या या घडामोडी घडल्या. त्या दिवशी मुंडे मेळाव्याला येणार आहेत, हे बबनरावांपासून लपवून ठेवल्याचं सांगितलं जातं.

भगवानगडावरील दसरा मेळावा, वंजारा आरक्षण, ऊसतोड कामगार संघटना, बबनरावांचा साखर कारखान्यातील वाद; यांवरुन गोपीनाथराव मुंडे आणि बबनराव ढाकणे यांच्यात टोकाचा संघर्ष झाला.

आज बबनराव ढाकणे इहलोक सोडून गेले.. तर २०१४मध्ये गोपीनाथराव मुंडेंचा अपघाती मृत्यू झाला होता. हे दोन नेते गेल्याने वंजारा समाजाचं मात्र अपरिमित नुकसान झालं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com