संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बाळासाहेब ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं होतं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thackray

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बाळासाहेब ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं होतं

आज महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ६२ वा वर्धापणदिन. १ मे १९६० ला महाराष्ट्राची स्थापना झाली. विविध भाषांच्या आणि संस्कृतीच्या विविधतेने नटलेल्या या महाराष्ट्राच्या स्थापनेमागे मोठा इतिहास आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी १०५ जणांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. कॉंग्रेस पक्ष आणि तात्कालीन नेत्यांच्या विरोधामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे मराठी माणसाचे स्वप्न लांबणीवर पडले आणि १०५ जणांच्या आहुतीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. पण या आंदोलनादरम्यान बाळासाहेब ठाकरे यांना सरकारवर टीका केल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. वाचा हा संपूर्ण किस्सा.

ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती त्यामुळे स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला होता. मुंबईसह मराठी भाषिकांचे एक राज्य स्थापन व्हावे अशी प्रमुख मागणी या चळवळीची होती. पण या मागण्याला कॉंग्रेस आणि मुंबईतील भांडवलदारांचा विरोध होता. मुंबईच्या विकासात गुजराती लोकांचा हात असल्याचं सांगत ते विरोध करत होते. त्यानंतर या वादाला तोंड फुटले आणि अवघ्या महाराष्ट्रभर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा उभा राहिला.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस.एम.जोशी, प्रल्हाद केव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, भाई उद्धवराव पाटील हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. प्रबोधनकार ठाकरे यांनी या चळवळीत आपलं मोठं योगदान दिलं होतं. त्यांनी आपल्या लेखणातून वारंवार सरकारवर टीका केली होती.

डिसेंबर इ. स. १९४८ मध्ये दार कमिशनने अहवाल प्रसिद्ध केला या अहवालात मराठी माणसांच्या मागणीला विरोध करण्यात आला होता. अहवालात महाराष्ट्रीय लोकांवर टीकाही करण्यात आली होती. त्यानंतर मराठी भाषिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. हा वाद पेटल्यानंतर नेहरूंनी सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

पुढे स.का. पाटील आणि तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी या मागणीला विरोध करत कॉंग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे लोक परत पेटून उठले होते आणि या चळवळीला वेग आला आणि २१ नोव्हेंबर इ. स. १९५५ रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला. या आंदोलनातील गोळीबारात मोरारजीच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले. त्यामुळे मोरारजी देसाईंना या चळवळीचे शत्रू मानलं जातं.

Balasaheb Thackeray

Balasaheb Thackeray

दरम्यान या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न केले जात होते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या घरी त्यावेळी चळवळीतल्या नेत्यांच्या बैठका होत असत. त्या बैठकांना त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरेही उपस्थित असायचे. या चळवळीला पाठिंबा देत त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी कॉंग्रेसवर एक व्यंगचित्र काढून टीका केली होती. त्यानंतर तात्कालीन कॉंग्रेस सरकारने त्यांच्या नावे अटक वॉरंट जारी केलं गेलं होतं.

या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनानंतर १ मे १९६० ला महाराष्ट्राची स्थापना झाली. पण या काळात १०५ मराठी हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती.