
औरंगाबादमधल्या 'त्या' शाखेपासून शिवसेना मराठवाड्यात पसरली आणि आज...
शिवसेनेची स्थापनाचं झाली ती मराठी माणसाचा आवाज म्हणून. मुंबईत वाढत चाललेला परप्रांतीयांचा जोर, नोकऱ्यांमध्ये मराठी तरुणांवर होणारा अन्याय याच्याविरुद्ध शिवसैनिक रस्त्यावर उतरला. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाने उठलेलं वादळ मुंबईच्या घराघरात जाऊन पोहचलं. शिवसेनेने बघता बघता मुंबई ठाणे महापालिका जिंकली. राजकारणात आपला जम बसवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वातच करिष्मा होता. पण हा करिष्मा त्यांना मुंबईच्या बाहेर ग्रामीण महाराष्ट्रात पोहचवण्यात मात्र कमी पडत होता. मराठी भाषिकांचा मुद्दा मुंबईबाहेर संयुक्तिक नव्हता, त्यामुळे पक्ष फक्त शहरी तोंडवळ्याचा राहिला.
आणीबाणी व नंतरच्या गिरणी कामगार संपाच्या कालावधीत शिवसेनेची वाढच थांबली होती. अखेर बाळासाहेब ठाकरेंनी ठरवलं पक्षाचं पंख मुंबईबाहेर विस्तारायचं. त्यासाठी पहिलं लक्ष्य होतं मराठवाडा.

Balasaheb Thackeray
ऐंशीचं दशक, शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका ठळकपणे मांडायला सुरु केली तेव्हाचा काळ. निजामाच्या राजवटीत झालेल्या जुलमाचा खुणा अंगावर मिरवणाऱ्या मराठवाड्यात शिरण्यासाठी बाळासाहेबांनी अंगावर भगवी शाल ओढली.
मराठवाड्यात आज गावागावांत शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी भारावलेली मंडळी आहेत. शिवसेनेच्या शाखा आहेत. अडचणीच्या वेळेस मदतीला धावून जाणारे शिवसेनेचे कार्यकर्ते पाहायला मिळतात. मराठवाड्यातील शिवसेनेची सुरवात झाली ती औरंगाबाद शहराच्या गुलमंडी येथून.

Raj Thackeray
8 जून 1985 रोजी तरुणांनी एकत्र येऊन गुलमंडीवर शिवसेनेची पहिली पाटी रोवली. जय भवानी, जय शिवाजी म्हणत वाटचाल सुरू झाली. मुंबई, ठाण्यात घुमणारी शिवसेनेच्या वाघाची डरकाळी औरंगाबादेत ऐकायला यायला लागली. गुलमंडीवर सुरू झालेल्या शाखेला चांगला प्रतिसाद मिळाला.बाळासाहेबांच्या विचाराने भारावलेल्या तरुणांची फौज शिवसेनेत दाखल व्हायला लागली तसा संघटनेचा विस्तार झाला. गुलमंडीनंतर पदमपुरा, हमालवाडा करत करत शहराच्या अनेक भागांत शिवसेनेचा भगवा झेंडा आणि पाटी झळकली. गावागावांतून लोक आमच्या गावात शाखा स्थापन करा म्हणत शिवसैनिकांना स्वखर्चाने घेऊन जायचे. १९८५ ते ९० हा पाच वर्षांचा काळ शिवसेना शहराप्रमाणेच खेड्यापाड्यात पोचण्याचा होता.
हिंदूंचे रक्षण हा मुख्य अजेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या शिवसेनेने १७ जानेवारी १९८६ ला पहिला मोर्चा शहरातून काढला. काळे धंदे बंद करा, मुस्लिमांची गुंडगिरी रोखा, सिल्लेखाना शहरातून हद्दपार करा आणि समान नागरी कायदा लागू करा या मागण्यांसाठीचा हा मोर्चा होता. क्रांती चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असतानाच सिटी चौकात मोर्चावर दगडफेक झाली. दगडाला दगडाने उत्तर दिले आणि जातीय दंगलीचा भडका उडाला. शिवसेनाच आमची रक्षणकर्ती हा विश्वास शहरवासीयांना देण्यात संघटना यशस्वी ठरली. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा ही बाळासाहेबांची मागणी देखील प्रचंड गाजली. राजकीय सुरवात १९८८ च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना राजकारणात उतरली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाड्यातली पहिली सभा झाली. त्यावेळी प्रथमच शिवसेनेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले.

Balasaheb Thackeray - Raj Thackeray
औरंगाबादच्या राजकीय इतिहासात चमत्कार घडवला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. आज मराठवाड्यात शिवसेनेचे फक्त ११ आमदार आणि ३ खासदार आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेवर देखील त्यांचं अनेक वर्ष वर्चस्व राहिलं. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे औरंगाबाद येथे सभा घेत आहेत. मशिदीवरील भोंगे हटवा ही मागणी करत त्यांनीही आपली हिंदुत्वाची शाल ओढली आहे. ज्याप्रमाणे शिवसेना औरंगाबादच्या गुलमंडी येथून चंचुप्रवेश करत मराठवाड्याच्या गावागावात पोहचली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचली तोच चमत्कार राज ठाकरेंची मनसे करेल का हे पाहणे रंजक ठरेल.
Web Title: Balasaheb Thackeray Raj Thackeray Shivsena Mns Aurangabad Marathwada
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..