
बहिणीने आंतरजातीय विवाह केला म्हणून बाळासाहेब ठाकरे चिडले नाहीत तर...
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची धाकटी बहिण संजीवनी करंदीकरांचं वयाच्या ८४ व्या वर्षी, वृद्धापकाळाने निधन झालं. प्रबोधनकार ठाकरेंची मुलगी आणि शिवसेनाप्रमुखांची लाडकी बहिण असलेल्या संजीवनी करंदीकर अतिशय करारी होत्या. गेल्या काही वर्षापासून त्या पुण्यात वास्तव्यास होत्या.
''स्वाभिमानाने जीवन कसं जगावं, याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आई होती, तिने एक डायरी केली होती, ज्यात तिने अत्यसंस्काराची देखील तजवीज करुन ठेवली होती. आम्हाला कसलाही त्रास होऊ नये, याची तिनं काळजी घेतली होती. तिचं आयुष्यचं प्रेरणादायी होतं'', अशा भावना संजीवनी करंदीकरांची मुलगी आणि शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस किर्ती पाठक यांनी व्यक्त केल्यात. (Balasaheb Thackeray's Sister passes away)
रिझर्व्ह बॅंकेत वयाच्या आठराव्या वर्षी निवड-
संजीवनी करंदीकर या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियात मशिन सेक्शन ऑफिसर होत्या. त्यांनी ३८ वर्ष रिझर्व्ह बॅकेत नोकरी केली होती. त्यांनी एक डायरी लिहीली होती,'' मी गेल्यानंतर ती डायरी वाचावी', असं त्यांनी कुटुंबियांना सांगून ठेवलं होतं. त्यात त्यांनी अगदी मी गेल्यानंतर पहिला फोन कोणाला करावा येथून सर्व माहिती लिहीली होती. आम्ही सगळेच तिच्या या स्वाभिमानी स्वभावाने अवाक् झाल्याच्या भावना त्यांची मुलगी किर्ती पाठक यांनी व्यक्त केल्या. वयाच्या अठराव्या वर्षीच त्या रिझर्व्ह बॅकेत नोकरीला लागल्या. त्यांचं शिक्षण जुन्या अकरावीपर्यंत झालं होतं. त्या सहा वर्षांच्या असताना त्यांच्या आई रमा ठाकरेंचं निधन झालं होतं. ती सर्व आठ भावंडं होती. बाळासाहेबांना संजीवनी या आपल्या तल्लख बुद्धीच्या बहिणीने खूप शिकावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र संजीवनीने आधी आपल्या पायावर उभं राहावं अशी इतर भावंडांची इच्छा होती, त्यानुसार त्यांनी रिझर्व्ह बॅंकेची परिक्षा दिली होती, आणि त्यांची निवडही झाली. (Sanjeevani Karandikar)
आंतरजातीय लग्नाचा निर्णय-
संजीवनी करंदीकरांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. प्रबोधनकारांनी आणि कुटूंबियांनी आपल्या मुलीच्या निर्णयाला पूर्ण पाठींबा दिला होता. जनार्दन करंदीकरांशी ठाकरेंच्या मुलींचं लग्न झालं. ते प्रबोधनकारांचे लाडके जावई होते. त्याचकाळात प्रबोधनकार ठाकरेंनी 'खरा ब्राम्हण' हे नाटक लिहीलं होतं. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. प्रबोधनकार हे ब्राम्हण विरोधी होते अशी टिका होऊ लागली. मात्र त्यांनी दांभिकतेविरुद्ध लिहीलं होतं. ठाकरे कुटुंबिय सीकेपी ब्राम्हण तर जनार्दन करंदीकर कोकणस्थ ब्राम्हण होते. हे लग्न त्याकाळी खूप गाजलं होतं. प्रबोधनकारांना ब्राम्हण जावई कसा चालला अशी टिका त्याकाळी झाली. खुद्द बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा आपल्या बहिणीचा आंतरजातीय विवाह झाला आहे, तिला त्यामुळे त्रास होईल का याची काळजी असायची. मात्र करंदीकर जोडप्याचा ५७ वर्षाचा सुखाचा संसार झाला.
बाळासाहेब आणि मीना ठाकरे यांच्याशी नातं-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचं लग्न झालं आणि (मासाँहेब) मीना ठाकरे घरी आल्या. संजीवनी करंदीकर तेव्हा दहा वर्षांच्याच होत्या. मीना ठाकरे आणि संजीवनी यांचं नातं नणंद-भावजयचं नाही, तर माय-लेकीचं होतं. आई म्हणजे माँसाहेब इतकं त्याचं नातं मायेचं होतं. बाळासाहेबांच्याही त्या लाडक्या होत्या. काळाच्या प्रवासात इतर भाऊ-बहिणी दूर निघून गेल्यानंतर, आता आपण दोघेच उरलो असं बाळासाहेब संजीवनीताईंना म्हणायचे. बाळासाहेबांच्या निधनानंतर मात्र त्यांना खूप एकटं पडल्याची भावना होती. संजीवनी करंदीकरांना किर्ती पाठक आणि स्वाती सोमण या दोन मुली आहेत.
शिवसेनेच्या प्रवासाच्या साक्षीदार-
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्हे यांनी संजीवनी करंदीकरांच्या आठवणींना उजाळा दिला, शिवसेनाप्रमुखांना शोभेल असाच त्यांचा अभ्यास आणि कार्य होतं, त्यांच्या घरी अनेकदा जाणं व्हायचं, शिवसेनेचा प्रवास त्यांनी जवळून पाहिला होता. त्यांच्या जाण्याने शिवसेना परिवाराची मोठी हानी झाल्याच्या भावना व्यक्त करत आंदरांजली वाहिली. तर शिवसेनेच्या युवतीसेनेच्या समन्वयक मनीषा धारणे यांनी त्या शिवसेनाप्रमुखांसारख्याच स्पष्टवक्त्या होत्या, त्यांना बऱ्याचदा भेटण्याचा योग आला, आजोबांनाही मी भेटलेय. संजीवनीताईंना भावपूर्ण आंदरांजली अशी प्रतिक्रिया सकाळ डिजिटलशी बोलताना दिलीय.
उद्धव ठाकरेंच्या आवडत्या आत्या -
उद्धव ठाकरेंना आत्या संजीवनी करंदीकरांचा लळा होता. ''उद्धवला मुख्यमंत्री झालेलं पाहायला बाळासाहेब असायला हवे होते,'' असं त्या नेहमी म्हणायच्या, अशी आठवण कुटुबियांनी सांगितली. संजीवनी करंदीकरांना किर्ती पाठक आणि स्वाती सोमण या दोन मुली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकऱ्यांनी संजीवनी करंदीकरांच्या कुटुंबाचं सांत्वन केलंय.
Web Title: Balasaheb Thacketays Sister Sanjeevani Karandikar Passes Away
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..