बाळासाहेब थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष; प्रथमच पाच कार्यकारी अध्यक्ष

टीम ई-सकाळ
रविवार, 14 जुलै 2019

पृथ्वीराज चव्हाण जाहीरनामा समितीचे अध्यक्ष 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीरनामा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. तर माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर हे या समितीचे समन्वयक असतील. याखेरीज कॉंग्रेसच्या समन्वय समितीचे प्रमुखपद माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

नवी दिल्ली : कॉंग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देताना प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली असून, पाच कार्यकारी अध्यक्षही नेमले आहेत. यासोबतच निवडणुकांशी संबंधित सर्व समित्यांचीही घोषणा करण्यात आली. 

कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मान्यता दिल्यानंतर संघटन सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी थोरात यांच्या नावाची घोषणा केली. अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या पदी थोरात यांची नियुक्ती अपेक्षित होती. मात्र, त्यांच्या मदतीला पाच कार्यकारी अध्यक्षही देण्यात आले आहेत. कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलच्या प्रमुखपदाचा नुकताच राजीनामा दिलेले नितीन राऊत, विश्‍वजित कदम, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्‍त्यांद्वारे कॉंग्रेसने राजकीय आणि सामाजिक समीकरणे जपण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच निवडणूक विषयक समित्या नेमून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाही सामावून घेतले आहे. निवडणूक रणनीती समिती तसेच प्रदेश निवडणूक समितीचे अध्यक्षपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे असेल, तर माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील हे निवडणूक रणनीती समितीचे सहसमन्वयक असतील. 

पृथ्वीराज चव्हाण जाहीरनामा समितीचे अध्यक्ष 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीरनामा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. तर माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर हे या समितीचे समन्वयक असतील. याखेरीज कॉंग्रेसच्या समन्वय समितीचे प्रमुखपद माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तसेच किसान कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून नुकतेच पायउतार झालेले नाना पटोले हे विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार समितीचे प्रमुख असतील. रत्नाकर महाजन यांना प्रसिद्धी समितीचे प्रमुखपद देण्यात आले आहे. शरद रणपिसे हे निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख असतील. 

नवे विधिमंडळ पक्षनेते के. सी. पाडवी 
बाळासाहेब थोरात यांची अलीकडेच विधिमंडळ पक्षनेतेपदी नेमणूक करण्यात आली होती. आता त्यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमल्यामुळे विधिमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी के. सी. पाडवी यांना देण्यात आली आहे. थोरात यांनी कॉंग्रेसच्या सत्ताकाळात कृषी, महसूल यांसारख्या खात्यांची जबाबदारी हाताळली होती, तर संघटनात्मक कामकाजात थोरात यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेसच्या छाननी समितीच्या प्रमुखपदाचीही जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते कॉंग्रेस कार्यकारिणीचे कायम निमंत्रित सदस्यही आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thorat elected as Maharashtra Congress President