
Ajit Pawar : अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख; दादा म्हणतात 'मुख्यमंत्री होण्यासाठी...'
NCP Ajit Pawar News: राष्ट्रवादीकडून होणाऱ्या बॅनरबाजीची सध्या सातत्याने चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच जयंत पाटलांच्या बॅनरची चर्चा होती, तर आता आज अजित पवारांमुळे चर्चा होत आहे. कारण म्हणजे या पोस्टरवरचा विशेष उल्लेख.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर हे पोस्टर्स लागले आहेत. यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा उल्लेख करण्यात आला आहे. "महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा, एकच वादा अजित दादा", असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे.
या पोस्टर्सवरती जयंत पाटील आणि अजित पवार यांना दोघांनाही भावी मुख्यमंत्री असं संबोधलं आहे. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या मलबार हिल भागात पोस्टर्स लागले होते. या पोस्टर्सवर जयंत पाटील यांचा उल्लेख 'भावी मुख्यमंत्री' असा करण्यात आला होता. यासंबधी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काही उत्साही कार्यकर्त्यांनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून बॅनर लावले, पण 145 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. असे पोस्टर लागले तर ते मनावर घेऊ नका, त्या पोस्टरला फार महत्त्व देऊ नका. उद्या जर मी तुमचं होर्डिंग लावलं, तरी 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या होर्डिंग लावण्याला काहीही अर्थ नाही. हे फक्त कार्यकर्त्याचं वैयक्तिक समाधान असतं, असं अजित पवार म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा अजित पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. त्याचबरोबर अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल असं निलेश लंके यांनी केलं होत.तेव्हापासून या चर्चा सुरू झाल्या आहेत.