मुदतवाढीतही शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज; सहकार विभागाची माहिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

पीककर्ज परतफेडीसाठी दिलेल्या मुदतवाढीनुसार 30 मेपर्यंतचा व्याजाचा केंद्राचा हिस्सा केंद्र सरकार देणार आहे. त्यामुळे परतफेडीसाठी दिलेल्या मुदतवाढीच्या कालावधीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळेल.

पुणे - पीककर्ज परतफेडीसाठी दिलेल्या मुदतवाढीनुसार 30 मेपर्यंतचा व्याजाचा केंद्राचा हिस्सा केंद्र सरकार देणार आहे. त्यामुळे परतफेडीसाठी दिलेल्या मुदतवाढीच्या कालावधीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळेल, अशी माहिती सहकार उपनिबंधक दिगंबर साळुंखे यांनी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे रिझर्व्ह बॅंकेने पीककर्ज परतफेडीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीनुसार येत्या 30 जूनपर्यंत कर्जाची परतफेड करता येणार आहे. मात्र, या मुदतवाढीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळणार की नाही, याबाबत पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम आता दूर झाला आहे. पीककर्जासाठी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत व्याजात सवलत देण्यात येते. या सवलतीच्या रकमेचा आपापला हिस्सा अनुक्रमे केंद्र आणि राज्य सरकार देत असते. त्यामुळे मुदतवाढीत हा हिस्सा मिळणार की नाही, हे स्पष्ट नव्हते. परंतु, नियमानुसार केंद्र सरकार या कर्जावरील व्याजाच्या सवलतीचा मेपर्यंतचा हिस्सा भरेल, असे केंद्राने सहकार खात्याला पत्राद्वारे कळविले आहे. नियमानुसार केंद्राने हिस्सा दिला की राज्यालाही तो द्यावाच लागतो. 

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा वगळल्यानंतर केवळ चार टक्के व्याजदर आकारला जातो. या दरानुसार होणारे व्याज हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (पीडीसीसी) स्वनफ्यातून भरत असते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळते. मात्र, याचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी 31 मार्चपर्यंत परतफेड करणे अनिवार्य असते. 

एक महिन्याच्या व्याजाचा संभ्रम
पीककर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ 30 जूनपर्यंत दिलेली असून, व्याजाची सवलत मात्र मेपर्यंतच देणार असल्याचे केंद्र सरकारने कळविले आहे. त्यामुळे जून महिन्याचे म्हणजेच या एक महिन्याचे व्याज कोण भरणार?, याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the benefit of zero percent interest to farmer