
गुजराती, राजस्थानी निघून गेल्यास मुंबई आर्थिक राजधानी नाही; राज्यपालांच्या विधानामुळे वाद
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचं मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. कोश्यारी यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत, तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मुंबई संदर्भात बोलत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, जर गुजराती- राजस्थानी निघून गेले तर आर्थिक राजधानी मुंबई राहणार नाही, कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जे.पी. रोड, अंधेरी पश्चिम येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उदघाटन सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजस्थानी मारवाडी समाजाने व्यावसाय करताना केवंळ पैसा कमवला नाही तर शाळा-महाविद्यालये दवाखाने बांधली व गोरगरीबांची सेवा केल्याचं म्हटलं. हा समाज देशात तसेच नेपाळ, मॅरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगत जेथे हा समाज जातो तेथे आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरुप होतो, असे देखील राज्यपाल यावेळी म्हणाले.