esakal | हाथरस घटनेवर अश्रू ढाळणाऱ्या प्रियांका पुण्यातील प्रकरणावर चुप - चित्रा वाघ
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh and Priyanka Gandhi

"हाथरस घटनेवर अश्रू ढाळणाऱ्या प्रियांका पुण्यातील प्रकरणावर चुप?"

sakal_logo
By
सुधीर काकडे

राज्यात गेल्या काही दिवसांपासूम महिला अत्याचाराच्या घटनांची मालिकाच सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर हा मुद्दा प्रकर्षानं समोर आला. त्यातच आज पुण्यातील बिबवेवाडीमध्ये 14 वर्षीय मुलीचा नात्यातील तरुणाने धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं. तसंच त्यांनी यावेळी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींना आपण चुप का? असा प्रश्न विचारला आहे.

"प्रियंका जी, हाथरसच्या घटनेवर तुम्ही अश्रू ढाळले, पण पुण्यात घडलेल्या घटनेवर गप्प का आहात? ज्या मुलीची पुण्यात हत्या झाली, ती तुमच्या मुलीसारखी नाही का? की फक्त निवडणुकीमुळे युपीमध्ये तुमच्या संवेदना जाग्या झाल्या आहेत! महाविकास आघाडी सरकारची ची कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे?", असे म्हणत चित्रा वाघ यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे.

बिबवेवाडीतील यश लॉन्स परिसरामध्ये बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या मुलीची हत्या होत असताना या ठिकाणी इतर मुली कबड्डीचा सराव करीत होते. या धक्कादाय घटनेवर बोलताना चित्रा वाघ यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. "अतिशय भयानक, काय चाललयं पुण्यात, कोयत्याने वार करून खून, टाईप करतांनाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तीने" असं म्हणत चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्रबंद ?? असा प्रश्न देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

दरम्यान, क्षितिजा अनंत व्यवहारे असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. आरोपीचे नाव ऋषिकेश उर्फ शुभम बाजीराव भागवत व त्याचे दोन साथीदार आहेत असे निष्पन्न झाले आहे.

loading image
go to top