शेतकऱ्यांसाठी महिन्यात मोठी घोषणा - सुधीर मुनगंटीवार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जून 2019

गोडसेचा जन्म बारामतीला झाला
महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अर्थसंकल्पात १५० कोटी का ठेवले, असा प्रश्न विरोधकांनी विचारला. विरोधकांनी यासाठी नथुराम गोडसेचे नाव घेतले. त्यावर गोडसेचा जन्म बारामतीत झाला होता, असे सांगून अर्थमंत्र्यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली. त्यावर अजित पवार यांनी ही गोष्ट आम्हाला प्रथमच कळत असल्याचे सांगितले.

मुंबई - कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ३६ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पावरील चर्चा मंगळवारी संपली. त्यानंतर या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखली आहे. ते ऑगस्ट महिन्यात राज्यव्यापी विकास यात्रा काढणार आहेत. त्यापूर्वीच शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार ही मोठी घोषणा करू शकते. 

यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना ५८ हजार २४४ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे टार्गेट असून, बॅंकांना कसलेही आढेवेढे न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागेल. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीस यांनी ‘एसएलबीसी’च्या बैठकीत दिला आहे. त्यामुळे पीक कर्जाची आवश्‍यकता असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा हमखास कर्ज मिळेल, असे मुनगंटीवार म्हणाले. जलयुक्त शिवारचा फायदा न झाल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला होता. त्याला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी, पाऊस कमी पडला असतानाही यंदा २४ लाख टन पीक वाढल्याचा दावा केला.

राज्यावरील कर्जाच्या डोंगराचा विरोधकांनी केलेला आरोप खोडून काढताना मुनगंटीवार म्हणाले, की राज्यावर असलेल्या कर्जाची रक्कम सांगितली जात नाही, तर टक्केवारीच्या रूपात सांगितली जाते. राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात २८ टक्‍क्‍यांवर असलेला ऋणभार आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, सातवा वेतन आयोग देऊनही १५ टक्‍क्‍यांवर आणला आहे. विशेष म्हणजे अन्य राज्यांचा ऋणभार हा आपल्या राज्यापेक्षा जास्त आहे, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big Announcment for Farmer Sudhir Mungantiwar