

sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सध्या अकरावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जुलैअखेर अकरावीचे वर्ग सुरू होतील. तत्पूर्वी, १५ जूनपासून बारावीच्या विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू होत आहे. मात्र, यंदा अकरावी-बारावीतील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत उपस्थित राहावेच लागणार आहे. खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेऊन कॉलेज बुडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. याशिवाय, या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचेही बंधन असेल, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.
इयत्ता अकरावी-बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा आवश्यक असणार आहे. त्या शाळांनी त्यांचा यू-डायस क्रमांक व शाळेचे मान्यता प्रमाणपत्र दर्शनी भागात लावावे. कनिष्ठ महाविद्यालयाने परिसरातील कोणत्या खासगी कोचिंग क्लासेससोबत टायअप तथा करार केला आहे का, याचीही गोपनीय पडताळणी होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला बायोमेट्रिक मशीनवर दररोज हजेरी नोंदवावी लागेल.
दररोज वर्गशिक्षक विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवत असताना तेथील मुख्याध्यापकांना प्रत्येक वर्गातील उपस्थिती सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पाहावी लागेल, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचा कृती आराखडा सध्या तयार करण्यात आला असून, तो शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व महाविद्यालयांना पाठविला जाणार आहे. त्यानुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रभावी अंमलबजावणी करावीच लागेल, असेही ते म्हणाले.
‘सीसीटीव्ही’चे रेकॉर्डिंग जतन करावे लागणार
इयत्ता अकरावी-बारावीच्या वर्गात प्रवेश घेतलेले अनेक विद्यार्थी शाळेत कमी आणि खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नियमित हजेरी लावतात, अशा तक्रारी येत आहेत. काही शाळांनी खासगी कोचिंग क्लासेससोबत करार केल्याच्याही तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर आता सोलापूर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी-बारावीतील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय, प्रत्येक वर्गातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग साठवून ठेवावे लागणार आहे.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
पालक-शिक्षक समितीच्या परस्पर शुल्कवाढी बेकायदा
खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळा दरवर्षी काही प्रमाणात शिक्षण शुल्कात वाढ करतात. काही शाळा मोजक्याच पालकांसमवेत बैठक घेऊन शुल्कवाढ करतात. त्यानंतर उर्वरित पालक त्याविरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी करतात. दुसरीकडे, काही खासगी अनुदानित शाळादेखील प्रवेशावेळी शुल्क घेतात, अशाही तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर आता त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत बैठक घेऊनच शुल्कवाढीचा निर्णय घ्यावा लागेल. त्यानुसार कार्यवाही न करणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालये
कनिष्ठ महाविद्यालये
११०
प्रवेशित विद्यार्थी
३४,०००
वर्षातील विद्यार्थ्यांची उपस्थिती
७५ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.