मोठी बातमी! उमेदवारीचा तिढा अन्‌ विधानसभेला काँग्रेसची स्वबळाची तयारी; इच्छुक भावी आमदारांकडून 5 ऑगस्टपर्यंत मागविले अर्ज

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीकडे द्यावेत, असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे व जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड, नंदकुमार पवार यांनी केले आहे.
congress
congresssolapur sakal
Updated on

सोलापूर : शहर व जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीकडे द्यावेत, असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे व जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड, नंदकुमार पवार यांनी केले आहे.

राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर- ऑक्टोंबरमध्ये होणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर शहर- जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ५ ऑगस्टपर्यंत सोलापुरातील काँग्रेस भवनात जमा करावेत. काँग्रेसचे मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला (मोबाईल नं. ८८८८०४८८०८) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेसाठी प्रदेश चिटणीस किसन मेकाले, शहर कार्याध्यक्ष हणमंतू सायबोळु, दत्तु बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, अशोक कलशेट्टी आदी उपस्थित होते.

स्वबळाची तयारी की ताकदीचा अंदाज

महाविकास आघाडी, महायुतीतील पक्ष आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार की आघाडी, युती करून मैदानात उतरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्या काँग्रेसकडे दक्षिण सोलापूर, शहर मध्य, अक्कलकोट हे तीन मतदानसंघ आहेत. पण, काँग्रेसने ११ विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात आता काँग्रेस जिल्ह्यातील किती जागा मागणार, याचीही सर्वांना उत्सुकता आहे.

उमेदवारीचा तिढा निर्माण होण्याची शक्यता

काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी तर भाजप- शिवसेनेची युती असताना सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर हा मतदारसंघ काँग्रेसकडे तर युतीत शिवसेनेकडे होता. ‘शहर मध्य’ मध्येही अशीच स्थिती होती. तर पंढरपूर-मंगळवेढा व अक्कलकोट हे दोन्ही मतदारसंघ युतीत भाजपकडे तर आघाडीत काँग्रेसकडे होते. मात्र, राज्याच्या राजकारणात बदल झाल्यानंतर दक्षिण सोलापूर या मतदारसंघावर शिवसेना व काँग्रेस दोघांनीही दावा केला आहे. तर पंढरपूर-मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचा (शरदचंद्र पवार पक्ष) दावा आहे. इतरही मतदारसंघात अशीच स्थिती आहे. त्यामुळे लोकसभेतील यशानंतर काँग्रेसकडून स्वबळाची तयारी केली जात असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.