मोठी बातमी! अनुकंप तत्वावरील नोकर भरतीचा मार्ग मोकळा

अशोक मुरुमकर
Thursday, 30 July 2020

अनुकंप तत्वावरील नोकर भरतीसाठी लावण्यात आलेले निर्बंध मुख्यंमत्री उद्धव ठाकरे सरकाने उठवले आहेत.

अहमदनगर : अनुकंप तत्वावरील नोकर भरतीसाठी लावण्यात आलेले निर्बंध मुख्यंमत्री उद्धव ठाकरे सरकाने उठवले आहेत. यामुळे या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर २०११ च्या निर्णयानुसार भरती होणार आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भव रोखण्यासाठी मार्चपासून लॉकडाऊन आहे. याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. लोकप्रतिनीधींचे मानधन व कर्मचाऱ्यांच्या पगारदेखील यामुळे कपात करण्यात आल्या. याबरोबर विकास कामे देखील रद्द करण्यात आली आहेत.

कोरोना व्हायरसमुळे २०२०- २१ या आर्थिक वर्षात होणाऱ्या परिणाबाबत काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने ४ मे रोजी सरकार निर्णय काढला होता. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नोकरभरती करु नये असं म्हटलं होतं. यामुळे अनुकंपधारक उमेदवारांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. अनेक अनुकंपधारक वयोमर्यादेतून बाद होण्याची शक्यता होती. तर अनेक ठिकाणी रिक्त जागांची संख्या वाढली आहे. याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वित्त विभागाने गुरुवारी सरकारी निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये ४ मेमध्ये काढण्यात आलेल्या सरकारी निर्णयात दुरुस्ती केली आहे. या निर्णयात वित्त विभागाने म्हटलं आहे की, ११ सप्टेंबर २०१९ च्या सरकारी निर्णयानुसार केल्या जाणाऱ्या अनुकंप तत्वावरील भरतीस निर्बंध लागू राहणार नाहीत.

काय होता ११ सप्टेंबर २०११ निर्णय
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने ११ सप्टेंबर २०११ अनुकंप नियुक्तीसाठी पद भरतीची मर्यादा घालून दिली होती. यानुसार अनुकंप नियुक्तीच्या भरतीसाठी १० व २० टक्केची मर्यादा शिथील केली होती. वित्त विभागाचे ज्या पदांच्या भरतीवर निर्बंध नाहीत, अशा सरळसेवेच्या कोट्यातील सर्व पदांच्या बाबतीत गट क व गट ड मधील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या २० टक्के पदे अनुकंपाच्या नियुक्तीद्‌वारे भरण्यात यावीत. ही मर्यादा डिसेंबर २०२१ पर्यंत असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big news is that Chief Minister Uddhav Thackeray has cleared the way for recruitment