तात्या लांडगे
सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील सर्वच शिक्षकांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक असल्याचा निकाल दिला. त्यानंतर पदोन्नतीसाठी देखील हाच निर्णय लागू झाला. पण, त्यापूर्वी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळालेल्यांपैकी अनेक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकाऱ्यांची ‘टीईटी’ झालेली नाही. त्यांनाही आता टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागणार असून, त्यासाठी ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत मुदत असणार आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील ‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. टीईटी किंवा सीटीईटी पात्रताधारक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी नवीन सुधारित नियमावली व वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १४ मे रोजी काढलेले पत्र रद्द करून चालू वर्षातील व पुढील वर्षांतील पदोन्नतीची प्रक्रिया वेळेत व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी नवे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. आता १ सप्टेंबर २०२५ पर्यंत टीईटी झालेल्या शिक्षकांनाच नव्हे तर १ ऑगस्ट २०२६ पर्यंत टीईटी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाही पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक आयोजित होईल. त्यानंतर संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करून उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले जातील, असे शालेय शिक्षण विभागाच्या आदेशात नमूद आहे.
दरवर्षीचे पदोन्नतीचे ठरले वेळापत्रक
दरवर्षी १ जानेवारी रोजी तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून ३१ जानेवारीपर्यंत हरकतींनंतर अंतिम यादी जाहीर होईल. १५ ते २२ फेब्रुवारी दरम्यान समितीची बैठक घेऊन एका आठवड्यात पात्र उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे. ३१ मार्चपर्यंत पदोन्नतीचे आदेश देऊन २ मे रोजी शिक्षकांना नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले जाईल. या वेळापत्रकानुसार सर्व जिल्हा परिषदांना अंमलबजावणी अनिवार्य असणार आहे. याची जबाबदारी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर राहणार आहे. यात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन निर्णयांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.
पदोन्नती झालेल्यांनाही टीईटी बंधनकारकच
पूर्वीच्या शासन निर्णयानुसार १ सप्टेंबर २०२५ पूर्वी टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाच पदोन्नतीचा लाभ मिळणार होता. पण, नव्या शासन निर्णयानुसार आता १ ऑगस्टपर्यंत पात्रता पूर्ण करणाऱ्यांनाही पदोन्नतीचा लाभ मिळेल. टीईटी नसतानाही पदोन्नती झालेल्यांना मात्र ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.