
सोलापूर : शालेय शिक्षण विभागाच्या १३ फेब्रुवारी २०१३ पासून शिक्षक भरतीसाठी उमेदवार टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे, तरीपण काहींना तीन, पाच संधीच्या अटीवर मान्यता दिलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ३० मार्च २०१९ पर्यंत संबंधित शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारकच आहे. त्यानंतरही किती शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत, याची माहिती शालेय शिक्षण विभागाने तातडीने (२१ एप्रिलपर्यंत) मागवली आहे. त्या शिक्षकांच्या नोकरीवर कायमचे गंडातर येऊ शकते, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर आता शिक्षक भरतीतही बोगसगिरी झाल्याचे समोर येत आहे. बनावट कागदपत्रे सादर करून शिक्षक भरती झाली का, याअनुषंगाने पोलिस तपास करीत आहेत. तत्पूर्वी, राज्यातील किती शाळांमधील किती शिक्षक २०१३ नंतर नियुक्त झाले आणि त्यातील कितीजण टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत, यासंबंधीची माहिती शालेय शिक्षण विभाग संकलित करू लागला आहे. त्यातून बोगस टीईटीधारकांची माहिती समोर येणार आहे. आमदार प्रकाश बंब यांनी राज्य शासनाकडे २०१३ पासून आतापर्यंत ‘टीईटी’ उत्तीर्ण न झालेल्यांची माहिती मागविली होती. माहिती संकलित झाल्यावर मागील १२ वर्षांत टीईटी न करता शिक्षक म्हणून कार्यरत उमेदवारांना त्या पदावरून काढण्याची कारवाई होऊ शकते, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशातील ठळक बाबी...
१३ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयानुसार त्या तारखेनंतर नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांना टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक, मुख्याध्यापकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांची द्यावी माहिती
ज्या शिक्षकांची नियुक्ती १३ फेब्रुवारी २०१३ नंतरची आहे व ते अद्याप टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण झालेले नाहीत, त्यांची माहिती सोमवारपर्यंत (ता. २१) शाळांनी सादर करावी, त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर राहील
सुरवातीला शाळेचे नाव, शाळेचा यू-डायस कोड, शाळेचे माध्यम आणि टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे नाव, अशा प्रमुख चार मुद्द्यांवर माहिती मागविली, शेवटच्या रकान्यात शिक्षणाधिकाऱ्यांनी शेरा लिहायचा आहे
२१ एप्रिलपर्यंत मागविली शाळांकडून माहिती
बोगस टीईटी प्रमाणपत्र मिळविलेल्यांसह २०१३ नंतर नियुक्ती होऊनही टीईटी उत्तीर्ण नसताना शिक्षक म्हणून काम करणाऱ्यांची माहिती यातून समोर येईल. शासनाचे आदेश असताना देखील टीईटी उत्तीर्ण न झालेल्यांना त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यानुसार संबंधितांवर पुढील कारवाई होईल.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
‘टीएआयटी’ मेअखेर तर ऑक्टोबरमध्ये ‘टीईटी’
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ‘टीएआयटी’ उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. टीईटीनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होईल, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष महेश पालकर यांनी दिली. तर आगामी ‘टीईटी’ ऑक्टोबर २०२५ मध्ये होईल, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.