मोठी बातमी! पावसाळ्याच्या महिन्यात तापमान ३८ अंशावर; कडक उन्हामुळे शाळा भरणार सकाळच्या सत्रात; संचालक म्हणाले, ‘चर्चा सुरू आहे, लवकरच निर्णय’

सोलापूरमध्ये १५ ते १८ जूनदरम्यान हवामान उष्ण आणि कोरडे राहिले. पावसाळ्याच्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये शाळा सुरू झाल्यापासून सोलापूरचे कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी मागणी शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी संचालकांकडे केली आहे.
zp schools
zp schoolssakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूरमध्ये १५ ते १८ जूनदरम्यान हवामान उष्ण आणि कोरडे राहिले. पावसाळ्याच्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये शाळा सुरू झाल्यापासून सोलापूरचे कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी मागणी शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी संचालकांकडे केली आहे. त्यासंदर्भात चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय होईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिली.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. यंदा मॉन्सूनचे आगमन विलंबाने होत असल्याने सोलापूरसह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधील तापमान ३७ अंश सेल्सिअसवर राहिले आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळा पत्र्याच्या इमारतींमध्ये भरतात. अशातच ‘महावितरण’कडून लोडशेडिंग सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पत्र्याच्या वर्गखोल्यांमध्ये बसणे कठीण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात, निर्जलीकरण व अन्य आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात, अशी भीती शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील बहुतेक गावांमध्ये पाण्याची टंचाई असून, त्याचाही परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेचा विचार करून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ३० जूनपर्यंत सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने संचालकांकडे केली आहे. निवेदनावर महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, कार्याध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि सचिव नंदकुमार सागर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावर माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर म्हणाले, ‘‘संघटनांच्या मागणीवर चर्चा सुरू असून, लवकरच त्यासंदर्भात निर्णय होईल.’’

जूनमध्ये पहिल्यांदाच अशी मागणी

कडक उन्हामुळे विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू होणार आहेत. पण, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्येही यंदा जूनमध्ये तापमान ३८ अंशांवर राहिले आहे. मार्च ते मे या महिन्यांतही कडक उन्हाळा जाणवला. सध्या विद्यार्थ्यांना अशा कडक उन्हात शाळेत यावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी मागणी शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी केली आहे.

शासन स्तरावर होईल निर्णय

जून महिन्यात शाळा सुरू झाल्यापासून तापमान जास्त जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर संघटनांनी शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात शासन स्तरावरून लवकरच निर्णय होईल.

- कादर शेख, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com