

sarpanch reservation announce
grampanchayat election
तात्या लांडगे
सोलापूर : जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये जिल्ह्यातील ६५० ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार सध्या या ग्रामपंचायतींवर मावळते सरपंच प्रशासक आहेत. ४ मे रोजी या ग्रामपंचायतींची प्रभागरचना अंतिम झाली आहे. तत्पूर्वी, सरपंच आरक्षणही जाहीर झाले आहे. आता मतदार यादीचा कार्यक्रम राहिला आहे. नोव्हेंबरमध्ये या ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या अंतिम होऊन नोव्हेंबरअखेर मतदान पार पडेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्य सरकारच्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार ३० मार्चपर्यंत प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर प्रारूप प्रभागरचनेवर हरकती नोंदविण्यासाठी १३ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. प्राप्त हरकतींवर सुनावणी होऊन ४ मे रोजी ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागरचना जाहीर झाली. आता निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अंतिम कराव्या लागणार आहेत. तत्पूर्वी, सध्या सुरू असलेला मतदार पुनरीक्षण कार्यक्रमदेखील पूर्ण होईल. ३० जून ते २९ जुलैपर्यंत ‘बीएलओ’ प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन मतदारांची माहिती एका फॉर्ममध्ये भरून घेतील.
५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. त्यानंतर ४ सप्टेंबरपर्यंत प्रारूप याद्यांवर हरकती व दावे दाखल करता येतील. ५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत त्या हरकतींचा निपटारा होईल. ७ नोव्हेंबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होतील. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी याच मतदार याद्या वापरल्या जातील. त्यामुळे नोव्हेंबरअखेर जिल्ह्यातील साडेसहाशे ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच जनतेतून निवडले जाणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सद्यःस्थिती
तालुका मुदत संपलेल्या ग्रामपंचायती
बार्शी ९५
माढा ८३
मोहोळ ७२
अक्कलकोट ७१
पंढरपूर ७१
सांगोला ६२
करमाळा ५१
द. सोलापूर ५२
माळशिरस ४६
उ. सोलापूर २४
मंगळवेढा २३
एकूण ६५०
प्रशासक नियुक्तीविरोधात २२ जूनला सुनावणी
जानेवारी-फेब्रुवारीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय झाला. राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर, नागपूर व कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल झाल्या. त्यांची सध्या मुंबई उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरू आहे. यासंदर्भात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. आता यासंदर्भात २२ जून रोजी सुनावणी होणार आहे. त्याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदान पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ३० जून ते २९ जुलैपर्यंत बीएलओ प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन छापील अर्जांवर माहिती भरून घेतील. ७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
- किरण सुरवसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर
ग्रामपंचायत सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला
राज्यातील मुदत संपलेल्या (२०२४ व २०२५) ग्रामपंचायती व २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमधील ग्रामपंचायत सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला काढली जाणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सरपंचाची निवड जनतेतून होणार असली, तरीही गावपातळीवर पॅनेलचे महत्त्व आजही कायम आहे. कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडणार आणि कोणत्या ठिकाणी कोणाला संधी मिळणार, याचे उत्तरच या आरक्षण सोडतीतून मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नुकतीच प्रभागरचना अंतिम करून ठेवली आहे. आता प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया १० जुलैला अंतिम होणार आहे. त्यानंतर या निवडणुकीसाठी मतदारांची अहर्ता तारीख प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रभागाच्या आरक्षणाचे वेळापत्रक असे...
सोडतीसाठी ग्रामसभेची अधिसूचना : ८ जून
सोडतीसाठी ग्रामसभा : १२ जून
प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण प्रसिद्धी : १९ जून
प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना : १९ ते २५ जून
हरकतींवर प्रांताधिकाऱ्यांचा अभिप्राय : ३ जुलै
अंतिम प्रभागरचना प्रसिद्धी : १० जुलै
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.