भारत-चीन संबंध चिघळल्यास निर्यात होणार ठप्प; कोट्यवधींची शेतीमाल निर्यात अडचणीत

भारत-चीन संबंध चिघळल्यास निर्यात होणार ठप्प; कोट्यवधींची शेतीमाल निर्यात अडचणीत

पुणे - जागतिक कृषी उत्पादनाच्या नकाशावर बलाढ्य असलेल्या भारत-चीनच्या संबंधामध्ये बाधा आल्याने सुमारे १५ हजार कोटी (२०० कोटी डॉलर्स) रुपयांची शेतीमाल निर्यात अडचणीत आली आहे. दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणले गेल्यास कापूस आणि एरंडी तेल निर्यातीला मोठा धक्का बसू शकतो.

भारतातून २०१८ मध्ये ९२.१ कोटी डॉलर्सचा कृषी व संलग्न माल चीनच्या बाजारात गेला. गेल्या वर्षात मात्र त्यात दुपटीने वाढ झाली. चीनमध्ये गेल्या हंगामात अंदाजे २०० कोटी डॉलर्सचा कृषी माल निर्यात झाला. चीनने गेल्या वर्षी ५०.४ कोटी डॉलर्स किमतीचा कापूस भारताकडून विकत घेतला होता. देशात त्यामुळेच कापसाच्या किमती टिकून होत्या. त्या आधी २०१८ मध्ये चीनने १२.१० कोटी डॉलर्सचा भारतीय कापूस खरेदी केला होता.

‘‘गेल्या वर्षी २० लाख गाठी कापूस चीनकडे निर्यात झाला होता. यंदा १५ लाख गाठींची निर्यात अपेक्षित होती. पण आतापर्यंत केवळ सहा लाख गाठींची निर्यात झाली आहे. सध्याचे वातावरण निर्यातीला पोषक नाही. त्यामुळे भारताला पर्याय तयार ठेवावे लागतील,’’ अशी माहिती कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी संचालक अरविंद जैन यांनी दिली.

भारतीय एरंडी तेलाची सर्वात जास्त निर्यात चीनला होते. याशिवाय काही प्रमाणाच मत्स्य उत्पादने, सुगंधी चहा आणि शेंगदाणा तेलाची निर्यात चीनला केली जाते. द्विपक्षीय संबंध खूप बिघडल्यास ही सर्व निर्यात धोक्यात येईल.

चीनलादेखील तुरळक फटका बसू शकतो. भारतीय कंपन्यांनी २०१८ मध्ये जवळपास ४ कोटी डॉलर्स किमतीचा कृषी व कृषी प्रक्रियायुक्त माल चीनमधून आयात केला. गेल्या वर्षी ही आयात वाढून ४.९ कोटी डॉलर्सपर्यंत गेली आहे.

पशुखाद्यातील घटक, राजमा, बांबू, गव्हाचे ग्लुटेन, प्राणिज चरबी पदार्थ, अर्क, सफरचंद ज्यूस, यिस्ट तसेच विविध प्रकारचे तेल चीनमधून भारतात येते. चीनमध्ये भारतीय शेतमाल निर्यातीला मोठी संधी असल्याचे दोन वर्षांपूर्वी झालेल्या अभ्यासातून निष्पन्न झाले होते. काजू, चिंच, लिची, कॉफी, मका, तांदूळ, साखर, केक, ब्रेड तसेच बिस्किटांची मोठी आयात चीन  इतर देशांकडून करतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२०१८ मध्ये या कृषी उत्पादन आयातीवर ९ कोटी डॉलर चीनने खर्च केले. मात्र, यातील एकही उत्पादन भारतातून गेले नव्हते, असे अभ्यासात आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय एरंडी तेलाचा सर्वात मोठा ग्राहक सध्या चीन आहे. जगातील ९० टक्के एरंडी भारतात पिकते. त्यातही पुन्हा ८० टक्के क्षेत्र एकट्या गुजरातचे आहे. त्यामुळे देशातील एरंडी तेल निर्यातदार चिंतेत आहेत. देशातून २०१८ मध्ये ५० हजार टन तर गेल्या वर्षात ४६ हजार टन एरंडी तेलाची निर्यात झाली. विशेष म्हणजे किमतीत बोलायचे झाल्यास ४२.२ कोटी डॉलर्सचे एरंडी तेल एकट्या चीनने २०१८ मध्ये भारताकडून घेतले. गेल्या वर्षी मात्र ही निर्यात घसरून ३७.२ कोटी डॉलरवर आली.

भारत-चीन संबंध बिघडल्यामुळे भारतीय कापूस निर्यातीच्या आघाडीवर चिंता आहे. कापूस आणि धागे याचा मोठा ग्राहक चीन आहे. त्यामुळे व्यापार युद्ध सुरू झाल्यास भारतीय कापूस उद्योग आणि उत्पादकांसमोर काही प्रश्न उभे राहतील. त्याची उत्तरे आपण आतापासूनच शोधायला हवीत.
- प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरीज् ओनर्स एसोसिएशन (केजीपीए)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com