गोड बातमी : 'लेक लाडकी महाराष्ट्राची'; राज्यात मुलींचा जन्मदर वाढला

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 26 September 2019

ग्रामीण भागात हे प्रमाण एक हजार मुलांमागे 903 मुली असे आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या (सीआरएस) आकडेवारीनुसार कोकणातील सिंधुदुर्गात मुलींच्या जन्माचे प्रमाण 965 असून, याबाबतीत हा जिल्हा राज्यात अव्वल आहे.

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. 

2013 मध्ये मुलींच्या जन्माचे लिंगप्रमाण एक हजार मुलांमागे फक्त 900 होते, जे 2013-2014 मध्ये 914 वर सुधारले गेले. पण, 2015 मध्ये हे प्रमाण कमी होऊन 907 वर पोचले. 2016 आणि 2017 मधील जन्मनोंदणीचे प्रमाण अनुक्रमे 904 आणि 913 आहे. 2018 च्या ताज्या अहवालानुसार हे प्रमाण 916 वर सुधारले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील शहरी भागात हजार मुलांमागे मुलींची संख्या 920 होती. जी राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.

ग्रामीण भागात हे प्रमाण एक हजार मुलांमागे 903 मुली असे आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या (सीआरएस) आकडेवारीनुसार कोकणातील सिंधुदुर्गात मुलींच्या जन्माचे प्रमाण 965 असून, याबाबतीत हा जिल्हा राज्यात अव्वल आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्हा असलेल्या नंदुरबारमध्ये हजार मुलांमागे 954 मुली जन्माला येतात. रत्नागिरीतही 953 एवढा स्त्री जन्मदर आहे. 

स्त्री जन्मदराच्या तळाशी असलेल्या जिल्ह्यांमध्ये बुलडाणा (857), कोल्हापूर (870) आणि जालना (879) यांचा समावेश आहे. नोंदणीकृत कार्यक्रमांवर आधारित मुंबईतील लिंग प्रमाण 939 आहे; तर ठाणे, पालघर, पुणे आणि रायगडमध्ये अनुक्रमे 926, 928, 914 आणि 916 असे आहे. आरोग्य विभागाने लिंग प्रमाणातील वाढीचे श्रेय प्री-नेटल डायग्नोस्टिक टेक्‍निक (नियमन आणि गैरवापर प्रतिबंध) कायदा 1994 (पीसीपीएनडीटी) च्या कठोर अंमलबजावणीला दिले आहे. 

पीसीपीएनडीटी कायदा आणि 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' ही मोहीम कठोरपणे राबविली गेली, तर स्त्री जन्मदर प्रमाणातील सुधारणा आणखी चांगली होऊ शकते. 
- रवींद्रकुमार जाधव, बालमानस व सामाजिक समस्या विश्‍लेषक

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

PuneRains : पुण्यात ढगफुटी झाली की नाही? तज्ज्ञ काय सांगतात?

- (Video) : 'पीएमसी'तील पैसे सुरक्षित; आता काढता येणार 'इतकी' रक्कम

- ईडीच्या कारवाईनंतर शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birth rate of girls is increased in Maharashtra State