भाजप-सेना युती होणार; मोदींकडूनही पुनरुच्चार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

"शिवसेनेला सत्तेची हाव नाही; मात्र, आम्हाला विकासासाठी सत्ता हवी आहे. भाजपसोबत आमची युती झालेलीच आहे. पुढचे सरकारदेखील युतीचेच येणार,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच युतीची घोषणा केली.

मुंबई : "शिवसेनेला सत्तेची हाव नाही; मात्र, आम्हाला विकासासाठी सत्ता हवी आहे. भाजपसोबत आमची युती झालेलीच आहे. पुढचे सरकारदेखील युतीचेच येणार,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच युतीची घोषणा केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला. वांद्रे कुर्ला कॉंप्लेक्‍स मैदानावर आज पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा झाली. या वेळी उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते. या सभेत बोलताना उद्धव यांनी पंतप्रधानांच्या समोरच युतीचा पुनरुच्चार केला. 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जागावाटपाबाबत वेगवेगळी वक्‍तव्ये केली होती, त्यावरून शिवसेना- भाजप युतीचे गणित जागावाटपाच्या चर्चेत फिस्कटण्याचे अंदाज वर्तवले जात होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या साक्षीनेच शिवसेना युतीसाठी तयार असल्याचे जाहीर केले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उद्धव यांचा उल्लेख लहान भाऊ, असा करत शिवसेनेसोबतचे नाते मजबूत असल्याचे स्पष्ट केले. 

दरम्यान, या सभेनंतर "मातोश्री'वर कॉंग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी उद्धव यांना युतीबाबत विचारले असता भाजपचा कोणता नेता काय बोलतो, याला अर्थ नसल्याचे सांगत चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांच्या वक्‍तव्याकडे दुर्लक्ष केले.

भाजप अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युतीच्या जागावाटपाचा निर्णय झालेला आहे. या दोन्ही नेत्यांनी युतीबाबतची चर्चा पूर्ण केलेली आहे. त्यामुळे इतर नेत्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP And Shivsena alliance may Possible