Vidhan Sabha 2019 : प्रचंड यशाच्या अहवालाने युवासेनेत जोश अन् युती होतेय 'बेहोश'

मृणालिनी नानिवडेकर
Tuesday, 24 September 2019

गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या ही निवडणुकीत युवा सेनेच्या आकड्यांच्या हट्टात युती अडकली आहे. अर्ध्या जागांचा हट्ट अशी या सेनेची मागणी असून १२२ जागांवर एकही अधिक जागा देणे शक्य नसल्याचे भाजपने कळवले आहे.

विधानसभा 2019
मुंबई -  गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या ही निवडणुकीत युवा सेनेच्या आकड्यांच्या हट्टात युती अडकली आहे. अर्ध्या जागांचा हट्ट अशी या सेनेची मागणी असून १२२ जागांवर एकही अधिक जागा देणे शक्य नसल्याचे भाजपने कळवले आहे. दोन्ही पक्षांचे नेते परस्परांशी चर्चा करत असतानाच प्रशांत किशोर यांच्या चमूने तयार केलेल्या अहवालामुळे सेनेला प्रचंड यश मिळणार असल्याचे आदित्य ठाकरे यांना वाटते आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे बालहट्ट महत्वाचा ठरत असल्याने आज प्रथमच युती संकटात आल्याचे चित्र तयार झाले असल्याचे समजते.

सोमवारी  दुपारी १२२ च्या वर जागा देणे शक्य नसल्याचे भाजपने कळवले. त्यानंतर 'दोन्ही पक्ष युती लवकरच' ,कोणत्याही क्षणी असे सांगत असले तरी आज चर्चा ठप्प झाली होती. सेनेने हाच आग्रह कायम ठेवला तर भाजपने सर्व जागांची तयारी केली आहे. भूपेंद्र यादव यांनी दिवसभर मुख्यमंत्र्यांसह बैठका घेतल्या.

युतीचा फैसला 26 सप्टेंबर रोजी? 
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीचे घोंगडे भिजत पडले असून येत्या 26 सप्टेंबर रोजी युतीचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा 26 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होत असून, त्या दिवशी युती होणार किंवा नाही याबाबतचा निर्णय होणार आहे. 

अमित शहा मुंबईत येण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. या दोन दिवसांत दोन्ही पक्ष जागावाटपावर चर्चा करणार आहेत. या दोन दिवसांत शिवसेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होईल, आणि चर्चेची माहिती शहा यांना देण्यात येईल. त्यानंतर शहा यांच्या सल्ल्यानुसार युतीबाबत घोषणा होणार असल्याचे भाजप सूत्रांकडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडून समाधानकारक प्रस्ताव येत नसल्यामुळे भाजपही अडून बसला आहे. लोकसभा निवडणुकी वेळी भाजपने नमती भूमिका घेत शिवसेनेला अतिरिक्त जागा सोडली होती. तसेच कोकणातील नाणार प्रकल्पही रद्द केला होता. त्यामुळे आता शिवसेनेने राजकीय वस्तुस्थितीचा विचार करून भूमिका घ्यावी, अशी भाजपची अपेक्षा आहे. त्यानुसार भाजपकडून 105 आणि 165 असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, शिवसेना अधिक जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत कोण माघार घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

युतीची चिंता आम्हालाही आहे : भाजप 
कोणी काहीही म्हटले तरी भाजप-शिवसेना या दोन पक्षांची युती होणार आहे. युतीची चिंता आम्हाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. लवकरच जागावाटपाचा मुद्दा निकालात काढला जाईल. भाजप-शिवसेनेची युती होईल. युतीची आम्हाला चिंता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट कर 22 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढणार असून, रोजगारनिर्मिती होईल. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला होणार आहे, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP has informed that it is not possible to give more than One hundred twenty two seats