Kirit Somaiya on Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांचे ट्विट; म्हणाले… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Kirit Somaiya awhad arrest appreciate Shinde Fadnavis government action on jitendra awhad

Kirit Somaiya on Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांचे ट्विट; म्हणाले…

मुंबई : राज्यात हर हर महादेव चित्रपटावरून पेटलेल्या वादाने आता राजकीय वळण घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना चित्रपटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान आज आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. हर हर महादेव चित्रपटावरून ठाण्यातील एका चित्रपटगृहातील शो बंद पाडत चित्रपटगृहात गोंधळ घातल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटगृहात एका तरुणाला मारहाण झाली होती. आव्हाड यांना वर्तकनगर पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या कारवाईचे स्वागत केले आहे.

"मी शिंदे फडणवीस सरकारच्या गुंडाइझम विरोधात केलेल्या कारवाईचे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचे स्वागत करतो . प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या अनंत करमुसे प्रकरणात देखील सरकारने आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे", असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा: Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

हेही वाचा: King Charles: किंग चार्ल्स यांच्यावर अंडी फेकणाऱ्याला अनोखी शिक्षा; आता कधीच करता येणार नाही 'हे' काम

अटक झाल्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. "आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो."

पुढे आव्हाड यांनी सांगितले की, "मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल."

"हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही." असेही आव्हाड म्हणाले.