esakal | 'कलम ३७०बाबत भूमिका स्पष्ट करा'
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah solapur

 जम्मू-काश्‍मीरसाठीचे कलम ३७० हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे का विरोध,  हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी स्पष्ट करावे, असे आव्हान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे दिले.

'कलम ३७०बाबत भूमिका स्पष्ट करा'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - जम्मू-काश्‍मीरसाठीचे कलम ३७० हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे का विरोध,  हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी स्पष्ट करावे, असे आव्हान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेचा समारोप आज अमित शहा यांच्या उपस्थितीत येथे झाला. त्या वेळी शहा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेचा भडिमार केला. 

‘‘जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा आणि हिताचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा काँग्रेस वेगळी भूमिका घेते. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा वापर पाकिस्तान त्यांच्या फायद्यासाठी करण्याचा प्रयत्न करत आहे. चांगल्या निर्णयाला साथ देता येत नसेल, तर किमान गप्प तरी बसा,’’ असा घणाघात शहा यांनी केला. 

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामांची यादीच शहा यांनी या वेळी सादर केली. वसंतराव नाईक यांच्यानंतर पूर्ण पाच वर्षे सत्तेत राहणारे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. 

‘‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने भ्रष्टाचाराशिवाय काही केले नाही. आघाडीने राज्यासह केंद्रात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. दोन्ही पक्षांनी नेहमी घराणेशाहीला प्राधान्य दिले,’’ असे सांगतानाच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. गेली १५ वर्षे  राज्यात आणि गेली १० वर्षे केंद्रात तुमचीच सत्ता होती. या वेळी राज्यासाठी काय केले, हे पत्रकार परिषद बोलावून सांगावे, असे आवाहन त्यांनी पवारांना केले. 

२०१४ पूर्वीच्या १५ वर्षांत काय कामे केली याचा हिशेब देण्याचे आवाहन अमित शहा यांनी पवार यांना केले. १३ व्या वित्त आयोगाने महाराष्ट्राला एक लाख १५ हजार कोटी दिले. मोदी सरकारच्या काळातील १४ व्या वित्त आयोगाने राज्याला दोन लाख ८६ हजार कोटी रुपये दिले. एवढेच नाही, तर १०० पैकी १०० लोकांना मिळाले. फडणवीस यांनी त्यामध्ये २५ टाकून १२५ रुपये लोकांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

अजित पवार यांच्यावरही शहा यांनी टीका केली. ‘‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र मागे पडला. सिंचनासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी दिला गेला; पण एक थेंबही पाणी मिळाले नाही. फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत विकासकामे करून महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर नेला.’’

शहा म्हणाले, ‘‘काश्‍मीरमधील ३७० कलम रद्द करून मोदी यांनी काश्‍मीरच्या विकासाचे दरवाजे उघडले आहेत. पाकिस्तान सीमेपलीकडून नेहमीच कुरापती करत होता, त्या आता बंद झाल्या आहेत. पाच ऑगस्टपासून काश्‍मीरमध्ये एकही गोळी झाडलेली नाही, एकही मृत्यू झाला नाही. अशी स्थिती ७० वर्षांपूर्वी का निर्माण झाली नाही? मोदींमध्ये हिम्मत होती. त्यांच्याशिवाय इतर कुणामध्येही हिंमत नव्हती.’’

कलम ३७० व ३५ (अ) हे निर्णय योग्य की अयोग्य याबाबत लोकांना प्रश्‍न विचारले. लोकांनी सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगितले. ‘‘राहुल गांधी व शरद पवारांना दहशतवाद हा सुरूच राहावा असेच वाटत होते, त्यामुळेच त्यांनी या दोन्ही निर्णयांचा विरोध केला. काश्‍मीरच्या विषयावर राहुल काहीही बोलत सुटले आहेत. त्यांच्या बोलण्याचा उपयोग पाकिस्तान करून घेत आहे. यूएनमध्ये राहुल यांच्या बोलण्यावरून पाकिस्तानने याचिका दाखल केली. सर्जिकल स्ट्राइक व एअर स्ट्राइकचे पुरावे राहुल यांनी मागितले; पण आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही हे दोन्ही हल्ले झाल्याचे मान्य केले आहे,’’ असे शहा म्हणाले. 

शहा म्हणाले, ‘‘देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत यापूर्वी भाजप नेहमी काँग्रेससोबत राहिला आहे. मात्र, आता काँग्रेस सुरक्षिततेच्या बाबतीत वेगळाच मार्ग पत्करत आहे. खरेतर या गोष्टीवर सर्वांनी एक व्हायला हवे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमी मतांचे राजकारण केले.’’

समारोपावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महापौर शोभा बनशेट्टी, खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, रणजितसिंह नाईक- निंबाळकर, माजी खासदार विजयसिंह मोहिते- पाटील उपस्थित होते. 

ईव्हीएमवरून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणात ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य केले. सत्तेच्या मुजोरीमुळेच जनतेने आघाडीला नाकारले. बारामतीत सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगले, सोलापूरमध्ये जयसिद्धेश्वर महास्वामी निवडून आले तर ईव्हीएम वाईट असे कसे, असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी  उपस्थित केला.

पुन्हा देवेंद्र!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मागील पाच वर्षांचे कामकाज पारदर्शक आहे, त्यामुळे पुढील निवडणुकीतही त्यांना पुन्हा संधी देण्याचे आवाहन शहा यांनी केले. २०१४ पूर्वीच्या १५ वर्षांचा मोठा खड्डा पडला आहे, तो भरून काढण्यासाठी जनतेने पुन्हा फडणवीस यांना संधी द्यावी, असे ते म्हणाले. त्यामुळे यापुढील मुख्यमंत्रीही फडणवीसच असतील, असे सूतोवाच त्यांनी केले.

महाडिक, गोरे भाजपमध्ये
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कोल्हापूरचे ‘राष्ट्रवादी’चे नेते धनंजय महाडिक, उस्मानाबादमधील ‘राष्ट्रवादी’चे राणा जगजितसिंह, सातारा जिल्ह्यातील माणमधील काँग्रेसचे जयकुमार गोरे या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

विधान चुकीचे ः सुळे
‘कलम ३७० रद्द केल्यानंतर आता महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. राहुल गांधी तर हा निर्णय चुकीचा आहे असे म्हणतात, त्यामुळे आता जनतेनेच काय अयोग्य हे ठरविण्याचे आवाहन शहा यांनी केले. तसेच, सुप्रिया सुळे यांनीही ३७०च्या विरोधात मतदान केले आहे, त्यामुळे राज्यातील जनता त्यांना जाब विचारेल, असेही त्यांनी सांगितले. त्यावर ‘मी मतदानच केले नव्हते, याची नोंदही संसदेच्या पटलावर आहे. शहा यांचे विधान चुकीचे आहे,’ असे सुप्रिया सुळे यांनी नंतर स्पष्ट केले.

loading image
go to top