Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीने मला विरोधीपक्ष नेतेपदाची ऑफर दिली होती : एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला विरोधीपक्ष नेतेपदाची ऑफर देण्यात आली होती. तसंच त्यांनी आपल्यासाठी एबी फॉर्मदेखील आणला होता, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला विरोधीपक्ष नेतेपदाची ऑफर देण्यात आली होती. तसंच त्यांनी आपल्यासाठी एबी फॉर्मदेखील आणला होता. असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.

दरम्यान, विधानसभेसाठीचे मतदान आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यातच उमेदवारांचा प्रचारही अंतिम टप्प्यात आला आहे. भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, भुसावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना खडसे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला विरोधीपक्ष नेतेपदाची ऑफर देण्यात आली होती. तसंच त्यांनी आपल्यासाठी एबी फॉर्मदेखील आणला होता. 

यावेळी बोलताना खड़से पुढे म्हणाले, माझ्यावर अन्याय झाला असून आजही मी पक्षाला तेच विचारतोय की मी काय गुन्हा केला आहे ? ज्या पक्षाने मला मोठं केलं, मंत्रीपद दिलं त्या मायेने एकाएकी मला सोडून दिलं. मात्र, तरीही मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो.

पाच वर्ष संजय सावकारे नाथाभाऊ यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. जवळचे आमदार मात्र पळून गेले. आता नाथा भाऊच्या मागे गेलो तर आपलेही तिकीट कापले जाईल अशी भीती त्यांना होती. मात्र तिकीट वाटप माझ्याकडे होते. मी महाराष्ट्राच्या पार्लमेंटरी बोर्डात असून, तिकीट वाटप मला विश्वासात घेऊनच झाले असेही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले. 

ज्या वेळेस मला विधानसभेने निलंबित केले होते त्यावेळेस एका सभेत प्रमोद महाजन म्हणाले होते की विधानसभेतला नाथाभाऊचा आवाज संपूर्ण महाराष्ट्राला आवडतो आणि विधानसभेने एकनाथ खडसे यांना निलंबित केले म्हणजे '' कुंकुवा विना सुवासिनीची कल्पना सहन करता येत नाही "  तसेच नाथाभाऊ विना विधानसभा ही कल्पना मला सहन होत नसल्याचे प्रमोद महाजन हे त्यावेळी बोलताना म्हणाले होते असेही यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितले. खरंतर यावरून एकनाथ खडसे यांनी यावेळी पक्षाने तिकीट न दिल्याने कुठेतरी मनातील खंत व्यक्त करून पक्षाला एक सुचक संदेश तर दिला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

2014 मध्ये युती तोडण्याचा राग शिवसेनेने माझा वर टाकला. मात्र हा निर्णय सामूहिक पक्षाचा होता तो निर्णय जाहीर करायला कोणी पुढे येत नव्हते मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ही धमक कोणात नव्हती म्हणून मी पुढे आलो असं एकनाथ खडसे म्हणाले. या वेळी एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्यावरही टिकास्त्र सोडलं.

राष्ट्रवादीवाले माझ्याकडे एबी फॉर्म घेऊन आले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाट पाहिली. मात्र, अखेर राष्ट्रवादीस शिवसेनेकडून उसनवार घेतलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला. आणि त्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला त्यांनी अद्याप शिवसेना सोडली नसून पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिलेला नाही अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली. एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांना जे पंतप्रधानपदाचा दावा करतात त्या शरद पवारांना मुक्ताईनगर मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला एवढी दयनीय अवस्था शरद पवार यांची झाली असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

आपल्याला उमेदवारी मिळणार नाही यांची कल्पना दोन महिन्यांपूर्वीच देण्यात आली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चादेखील झाली होती. मला राज्यपालपदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु राज्यपाल बनून गप्प बसत जनतेला वाऱ्यावर सोडायचे का?,” असा सवाल खडसे यांनी यावेळी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp senior leader eknath khadse ncp offered opposition leader post maharashtra vidhan sabha election 2019