धक्कादायक ! युतीच्या पाच विद्यमान मंत्र्यांचा पराभव | Election Results

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि हरयाणा विधानसभा निवडणूक यांचे निकालाचे सुरवातीचे कल समोर आले आहेत. तसेच, भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारमधील एकूण पाच विद्यमान मंत्र्यांचा पराभव झाला आहे.

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि हरयाणा विधानसभा निवडणूक यांचे निकालाचे सुरवातीचे कल समोर आले आहेत. तसेच, भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारमधील एकूण पाच विद्यमान मंत्र्यांचा पराभव झाला आहे.

भाजपच्या मंत्र्यांपैकी परळी विधानसभा मतदारसंघातून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि मावळ विधानसभा मतदारसंघातून बाळा भेगडे तसेच, शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचा पराभव झाला आहे. जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पुरंदर विधानसभा मतदारसंघातून तर, अर्जुन खोतकर यांचा जालना मतदारसंघातून पराभव झाला आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर करून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्याने यंदाची विधानसभा निवडणूक गाजली होती. काही अपवाद वगळता यापैकी सर्व 'आयारामां'ना सत्ताधारी पक्षांनी उमेदवारी दिली आहे, त्यामुळे या जागांच्या निकालाकडे लक्ष होते. धनंजय मुंडे, रोहित पवार, आदित्य ठाकरे, आदिती तटकरे असे प्रमुख उमेदवारांचा विजय झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश हे नेते विजयी झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात उतरविल्याने ही लढत महत्त्वपूर्ण ठरली होती परंतु, पडळकर यांचा येथे पराभव झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP shivsena five ministers defeat in VidhanSabha election