esakal | मेगा भरतीत केवळ ‘या’ तीनच नेत्यांचा भाजप प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

मेगा भरतीत केवळ ‘या’ तीनच नेत्यांचा भाजप प्रवेश

गेल्या काही दिवसांपासून १ सप्टेंबरला सोलापुरात भाजपची मेगाभरती होणार असल्याच्या बातम्या होत्या. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांची नावे होती. पण, आता व्यासपीठावर केवळ तीनच नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कार्यक्रमात व्यासपीठावर ३८ नेते असणार आहेत.

मेगा भरतीत केवळ ‘या’ तीनच नेत्यांचा भाजप प्रवेश

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सोलापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तीनच दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यात कोल्हापूरचे धनंजय महाडिक, उस्मानाबादचे राणा जगजितसिंह आणि साताऱ्यातील जयकुमार गोरे यांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून १ सप्टेंबरला सोलापुरात भाजपची मेगाभरती होणार असल्याच्या बातम्या होत्या. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांची नावे होती. पण, आता व्यासपीठावर केवळ तीनच नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कार्यक्रमात व्यासपीठावर ३८ नेते असणार आहेत.

लोकसभेतील राष्ट्रवादीचे उमेदवार आज भाजपमध्ये
राणा जगगजितसिंह आणि धनंजय महाडिक यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. महाडिक यांना कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेते आणि कार्यकर्त्यांची साथ मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होते. तर, राणाजगजित सिंह यांनी विकासाच्या मुद्यावर भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले आहे. महाडिक यांचा भाजप प्रवेश होताना त्यांचा कोल्हापूरच्या महापालिकेतील ताराराणी आघाडीसह त्यांच्या धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मुळात या अटीवरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पक्ष संघटनेतील मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. महाडिक सध्या महापालिकेतील नगरसेवकांसोबत सोलापुरात दाखल झाले आहेत. पण, सभेत फक्त त्यांचा भाजपप्रवेश होणार असून, इतरांचे पक्ष प्रवेश कोल्हापुरातील कार्यक्रमात होणार आहेत.

उदयनराजे शिवसेनेत जाणार?
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. सोलापूरच्या सभेत ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात होते. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत होईल, अशी चर्चा सुरू झाली. तर, सोशल मीडियावर उदयनराजे भाजप नव्हे तर, शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या सगळ्यावर ‘राजकारणातूनच निवृत्त व्हावे, असे वाटते,’ अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली होती.

नारायण राणे यांचा भाजप प्रवेश लांबणीवर
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचाही सोलापूरच्या सभेत भाजप प्रवेश होईल, अशी चर्चा होती. पण, त्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे. राणे यांचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यात येणार आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे भाजपचेच आहे केवळ स्वाभिमानचे विलिनीकरण बाकी आहे, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. दरम्यान, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे आणि सांगली जिल्ह्यातील शिराळ्यातील राष्ट्रवादीचे नेते सत्यजित देशमुख यांचा भाजपप्रवेश लांबणीवर पडला आहे. देशमुख हे विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत.

loading image
go to top