बोगस शालार्थ आयडी! ‘एसआयटी’ने पुन्हा मागितली ३ महिन्यांची मुदतवाढ; ३ लाख कर्मचाऱ्यांच्या पडताळणीस लागतोय वेळ; थर्ड पार्टी तक्रारींवरही आता कार्यवाही

खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील सुमारे तीन लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यतांची तपासणी ‘एसआयटी’मार्फत सुरू आहे. सहा महिन्यांनंतरही तपासणी पूर्ण होऊ न शकल्याने आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव समितीने शासनाला पाठविला आहे.
shalarth Id froud
teachersakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील सुमारे तीन लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यतांची तपासणी ‘एसआयटी’मार्फत सुरू आहे. सहा महिन्यांनंतरही तपासणी पूर्ण होऊ न शकल्याने आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव समितीने शासनाला पाठविला आहे.

नागपूरमधील काही अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी बनावट शालार्थ आयडीद्वारे शासनाचा पगार उचलल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर नाशिकसह इतरही जिल्ह्यात असेच प्रकार समोर आले. यानंतर राज्य सरकारने सध्याचे ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती (एसआयटी) नेमली. राज्यातील सर्वच खासगी अनुदानित शाळांमधील (अल्पसंख्यांक व बिगर अल्पसंख्यांक) शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता, उपसंचालकांनी दिलेल्या शालार्थ आयडीची पडताळणी करण्याचे काम समितीकडे देण्यात आले. त्यासाठी समितीला तीन महिन्यांचा कालावधी दिला होता.

मुदतीत कार्यवाही पूर्ण न झाल्याने समितीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आता ही मुदत ७ ऑगस्ट रोजी संपली, तरीपण समितीचे कामकाज पूर्ण झालेले नाही. उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पवित्र पोर्टलशिवाय भरती केलेल्या पदांची पडताळणी सुरू आहे. त्यांनाही नियमित कामे पाहून पडताळणीसाठी वेळ लागत आहे. त्यामुळे समितीने पुन्हा तीन महिन्यांची मुदत मागितली असून ३० नोव्हेंबरपूर्वी समितीचा अहवाल शासनाला सादर होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

‘त्रयस्थ‘च्या तक्रारींवरही आता कार्यवाही

बनावट शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता बोगस असल्यासंदर्भातील हजारो तक्रारी ‘एसआयटी’सह शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या. मात्र, त्रयस्थ तक्रारदाराच्या (थर्ड पार्टी) तक्रारीवर कार्यवाही करायची की नाही, यासंदर्भात संभ्रम होता. यामुळे हजारो तक्रारी तशाच पडून होत्या. पण, यात उच्च न्यायालयाने आदेश दिले असून आता त्रयस्थ व्यक्तीच्या तक्रारींवरही संबंधित अधिकाऱ्यास कार्यवाही करता येणार आहे. तत्पूर्वी, त्या तक्रारदारास तक्रारीत तथ्य असल्याबद्दलचे स्वंयघोषणापत्र द्यावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com