राज ठाकरेंना चॅलेंज देणाऱ्या भाजप नेत्याला एकदा अटलजींनी तुरुंगात पत्र लिहिलेलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

brij bhushan sharan singh and raj thackeray ayodhya

राज ठाकरेंना चॅलेंज देणाऱ्या भाजप नेत्याला एकदा अटलजींनी तुरुंगात पत्र लिहिलेलं

तिहार तुरुंगात 30 मे 1996 रोजी तत्कालीन पंतप्रधानांचे पत्र एका बाहुबली खासदारापर्यंत पोहोचले. त्या पत्रात लिहिले होते, प्रिय ब्रिजभूषण जी, सप्रेम नमस्कार. तुमची बातमी कळाली, आता तुम्हाला जामिनासाठी नव्याने प्रयत्न करावे लागतील, जर अच्छे दिन आले नाहीत तर वाईट दिवस नक्कीच येणार नाहीत. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सावरकरांची आठवण ठेवा. पत्र लिहिणाऱ्या तत्कालीन पंतप्रधानांचे नाव होते अटलबिहारी वाजपेयी आणि ज्या खासदाराला त्यांनी हे अत्यंत भावनिक पत्र लिहिले, त्यांचे नाव आहे ब्रिजभूषण शरण सिंह...

सध्या मीडियामध्ये सोशल मीडियावर हे नाव फेमस झालं आहे ते राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवलं तर याद राखा अशी धमकी देणारा नेता म्हणून. एरव्ही राज ठाकरेंना धमकी दिली म्हणून एखाद्या नेत्याची इतकी मोठी चर्चा झाली नसती पण ती धमकी ब्रिजभूषण शरण सिंह याने दिलीय त्यामुळे सगळेजण गंभीरपणे घेत आहेत.

कोण आहे हा ब्रिजभूषण शरण सिंह ?

ब्रिजभूषण शरण सिंह हा उत्तरप्रदेशमधील गोंडा या मतदारसंघातला बाहुबली खासदार. 1988 च्या काळात तो पहिल्यांदा भाजपच्या संपर्कात आला आणि त्यांने स्वतःला हिंदुत्ववादी नेता म्हणून प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. भाजपच्या संपर्कात आल्यानंतर ब्रिजभूषण सिंग याने पहिल्यांदा विधान परिषदेची निवडणूक लढवली, पण 14 मतांनी त्याचा पराभव झाला. मात्र या पराभवानंतर तो कमकुवत झाला नाही, तर लोकप्रिय होत गेला. कारण होते रामजन्मभूमी आंदोलन.

साधारण ऐंशीच्या उत्तरार्धात अयोध्येत रामजन्मभूमीच्या आंदोलनाला जोर आला होता. इतर भाजप कार्यकर्त्यांप्रमाणे ब्रिजभूषण शरण सिंह सुद्धा या आंदोलनात आघाडीवर होता. एकेकाळी कुस्तीचे गाजवणाऱ्या ब्रिजभूषण शरण सिंह याची जनतेत मोठी हवा होती. बिहारमध्ये अडवाणींची राम रथयात्रा थांबवून अटक करण्यात आली, त्याचवेळी फैजाबाद प्रशासनाने ब्रिजभूषण सिंग याला महिनाभर तुरुंगात टाकले होते. अडवाणी तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी पहिला प्रवास अयोध्येतून सुरू केला आणि त्यात गोंडा ते फैजाबाद, फैजाबाद ते अयोध्या घाट आणि अयोध्या ते लखनौ या प्रवासात ब्रिजभूषण शरण सिंह अडवाणींचा सारथी म्हणून त्यांच्यासोबत राहिला. रामजन्मभूमीच्या आंदोलनात तो तडफदार भाषणं करून तो लोकप्रिय देखील झाला होता.

त्याची लोकप्रियता पाहून भाजप नेत्यांनी त्याला गोंडा येथून खासदारकीचं तिकीट दिले. रामजन्मभूमीच्या लाटेत 1991 मध्ये काँग्रेसच्या आनंद सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढत ब्रिजभूषण शरण सिंह पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आला. गोंडा लोकसभा मतदारसंघात आनंद सिंह यांच्या विरोधात तब्बल 113,000 मतांनी भाजपने मिळवलेला विजय हा ऐतिहासिक होता. 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा त्यामागे ब्रिजभूषण शरण सिंह याचा सुद्धा महत्वाचा रोल होता असं मानलं जातं.

पुढे या प्रकरणात लालकृष्ण अडवाणींसह 40 जणांना आरोपी बनवण्यात आले त्यामध्ये सीबीआयने ब्रिजभूषण सिंहला देखील अटक केली.

याआधी माजी केंद्रीय मंत्री कल्पनानाथ राय आणि ब्रिजभूषण यांना 1992 मध्ये मुंबईतील जेजे हॉस्पिटल गोळीबारात आरोपी बनवण्यात आले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा शूटर जो जेजे हॉस्पिटलमध्ये मारला गेला तो दाऊदच्या मेहुण्याचा खुनी होता. बदला घेण्यासाठी दाऊदने डॉन सुभाष ठाकूर आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांना सुपारी दिली होती. कल्पनानाथ राय आणि ब्रिजभूषण यांनी दाऊदने पाठवलेल्या शूटर्सना मदत केल्याचा आरोप होता. मात्र, या गंभीर आरोपात ब्रिजभूषण सिंहला क्लीन चिट मिळाली. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा राजकारणात आपल्या मसल पॉवरची ताकद दाखवायला सुरुवात केली.

त्यानंतर 1999 पासून तो सातत्याने निवडणुका जिंकत आहेत. यामागे त्याची दबंग प्रतिमा आणि आक्रमक राजकीय शैली यांचा मोठा वाटा मानला जातो. वेळप्रसंगी त्याने भाजप सोडूनदेखील निवडणूक जिंकल्या आहेत. मात्र तिथे देखील तो शांत बसला नाही. गोंडा नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांच्याशी भिडल्याची अशीच एक प्रसिद्ध घटना आहे. २००४ मध्ये मायावती यांनी गोंडाचे नाव बदलून ‘लोकनायक जयप्रकाश नारायण नगर’ करण्याची घोषणा केली होती. मात्र मोठ्या गर्दीत ब्रिजभूषण याने त्याला विरोध केला. त्याच बैठकीत मुख्यमंत्री मायावती यांच्याकडे तातडीने आपला निषेध नोंदवला आणि जनआंदोलनाची तयारी केली. हे प्रकरण पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्या आवाहनावर पंतप्रधान अटलजींनी मायावतींना ही घोषणा मागे घेण्यास सांगितले. शेवटी गोंडाचे नाव बदलले नाही.

वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणात २८ वर्षांनंतर ३० सप्टेंबर २०२० रोजी खासदार ब्रिजभूषण यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. देशातील सर्वात वादग्रस्त आणि दीर्घकाळ चाललेल्या खटल्यात तो निर्दोष सुटला तेव्हा समर्थकांनी जल्लोष केला. सर्व आरोप वाद आणि तुरुंग भेटीनंतरही त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला. त्यांच्या कुटुंबानेही त्यांच्या नावावर राजकीय वर्चस्व मिळवले. पत्नी खासदार आणि मुलगा आमदार झाला. त्यांची सक्रियता समाजात अनेकदा दिसून येते. त्याच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यासारख्या मोठ्या नेत्यांनी उपस्थिती दाखवली आहे. मात्र या दोन्ही नेत्यांच्या पाठींबा नसताना देखील ब्रिजभूषण शरण सिंह हा केवळ नेता म्हणूनच नव्हे, तर त्यांच्या राजकीय प्रवासात बाहुबली म्हणूनही ओळखला जातो, हे देखील तितकेच खरे आहे.

सध्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जून महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. एकेकाळी उत्तरभारतीयांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे फेमस झालेल्या राज ठाकरेंना ब्रिजभूषण सिंह या चा मोठा विरोध आहे. म्हणूनच राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा ब्रिजभूषण याने दिला आहे. राज ठाकरेंवर निशाणा साधताना तो म्हणाला की, राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांवर केलेला अत्याचार आम्ही विसरणार नाही. साधूसंतांनी राज ठाकरेंना माफ केलं तरच राज यांनी अयोध्येत प्रवेश देण्याबद्दल विचार करू. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. साधूसंत आणि अयोध्यावासी राज ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी.'

ब्रिजभूषण सिंह याच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. फक्त वक्तव्य करून तो थांबला नाही तर त्याने अयोध्येत राज ठाकरे यांना रोखण्याची तयारी सुरु केलीय. नंदिनीनगर इथे साधुसंत आणि नागरिकांसोबत त्याने बैठक घेतली. राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येत जाण्याचं जाहीर केलंय. मनसेनं सुद्धा या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु केलीय. भाजप नेते हा वाद शांततेने मिटवा यासाठी प्रयत्नात आहेत. बाहुबली अशी प्रतिमा असलेला ब्रिजभूषण शरण सिंह माघार घेणाऱ्यातला नाही. आता या वादाची निष्पत्ती नेमकी काय होते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Web Title: Brij Bhushan Sharan Singh Who Got Prime Minister Vajpayee Letter Jail Full Story Challenge To Raj Thackeray Ayodhya Visit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top