
Legislative Council : विधान परिषदेमध्ये अज्ञात व्यक्ती बसल्याची तक्रार; विधीमंडळाकडून आलं स्पष्टीकरण
मुंबईः विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आमदारांच्या जागी एक दुसराच व्यक्ती बसल्याची तक्रार आमदारांनी केली आहे. विधीमंडळ कार्यालयाकडून हे प्रकरण अतिशय गांभीर्याने तपासलं जात आहे.
सध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे आमदारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. मात्र आज विधान परिषदेत अज्ञात व्यक्ती बसल्याची तक्रार आमदारांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे केली आहे. तक्रारदार आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती माध्यमांना दिली आहे.
विधीमंडळ कार्यालयाकडून मात्र आमदारांनी सांगितलेल्या वर्णनाचा व्यक्ती सभागृहात नसून विधीमंडळाच्या गॅलरीत आढळल्याची माहिती दिली आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. आमदारांच्या सुरक्षेबाबत विधीमंडळातील सदस्यांकडून चिंता व्यक्त केली जातेय. सोमवारी विधीमंडळ कार्यालयाकडून स्पष्टीकरण येण्याची सूत्रांची माहिती आहे.
विधान परिषदेमध्ये खरंच एखादा अनोळखी इसम आमदाराच्या जागी बसलेला असेल तर ती अतिशय गंभीर बाब आहे. राज्याच्या सर्वोच्च सभागृहात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने धक्का बसला आहे.