
कॉंग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी प्रचंड लॉबिंग सुरू असल्याने हायकमांडदेखील हवालदिल झाल्याची चर्चा आहे.
मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन एक महिना लोटला, तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच कायम आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी तयार असल्याचे सांगितले जाते. मात्र, कॉंग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी प्रचंड लॉबिंग सुरू असल्याने हायकमांडदेखील हवालदिल झाल्याची चर्चा आहे. जोपर्यंत कॉंग्रेसचे "ग्रहण' सुटत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार रेंगाळण्याची शक्यता आहे.
उद्या मंगळवारी (ता. 24) मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नागपूर अधिवेशनात त्याबाबतचे सूतोवाचही केले होते. मात्र, कॉंग्रेसची यादी अंतिम झाली नसल्याने हा मुहूर्त टळल्याची माहिती आहे. आता हा विस्तार शुक्रवारपर्यंत (ता. 27) लांबणीवर पडणार, असे सांगण्यात येते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली. दिल्लीत कॉंग्रेसचे आज राजघाटावर एनआरसी कायद्याविरोधात आंदोलन असल्याने सर्व नेते व्यग्र होते. त्यातच झारखंड विधानसभा निकाल असल्याने प्रमुख नेत्यांना जबाबदारी देण्यात आली होती. झारखंडमध्ये सत्तास्थापनेचा पेच झाला, तर त्याबाबतची ठोस काळजी घेण्यासाठी हायकमांडमधील प्रमुख नेते लक्ष ठेवून होते. त्यामुळे मागील दोन-तीन दिवसांत कॉंग्रेसकडून मंत्रिपदाच्या उमेदवारांची यादी अंतिम झाली नसल्याची माहिती आहे.
उद्यापर्यंत ही यादी अंतिम होऊ शकते. मात्र, त्यानंतर 25 व 26 ला मुख्यमंत्री नियोजित कार्यक्रमासाठी मुंबईबाहेर आहेत. त्यातच 26 ला सूर्यग्रहण व अमावास्या असल्याने विस्तार नको, अशी काही नेत्यांची मागणी असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्तार 27 डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
संभाव्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे 14, कॉंग्रेसचे 10 व शिवसेनेचे 12 मंत्री शपथ घेतील, असा दावा केला जात असला; तरी तूर्तास संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता कमी आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीसह शिवसेना काही मंत्रिपदे रिक्त ठेवेल, असे मानले जाते.
विस्तारातले संभाव्य चेहरे
राष्ट्रवादी : अजित पवार, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, भारत भालके, बाबा जानी दुर्राणी, अण्णा बनसोडे, अदिती तटकरे यांचा समावेश होण्याचे संकेत आहेत.
तर कॉंग्रेसमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, वर्षा गायकवाड, के. सी. पाडवी, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे व सुनील केदार यापैकी दहा जणांचा समावेश असू शकतो.