संत नामदेव महाराजांच्या वंशजांविरुद्ध पंढरपुरात गुन्हा दाखल 

अभय जोशी 
Friday, 17 July 2020

आषाढी वारीनंतर झाला होता सोहळा 
प्रथेप्रमाणे आषाढी यात्रेनंतर सहा जुलै रोजी संत नामदेवांचे वंशज नामदास महाराज यांच्या उपस्थितीत महाद्वार काल्याचा सोहळा झाला. महाद्वार काल्याचे जनक कान्हैया हरीदास यांचे विद्यमान वंशज मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर त्यांच्या देवघरातील श्री विठ्ठलाच्या पादुका ठेवून परंपरेप्रमाणे महाद्वार काल्याचा सोहळा झाला होता. 

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी यात्रेनंतर परंपरेनुसार सहा जुलै रोजी महाद्वार काल्याचा सोहळा झाला होता. त्यावेळी मिरवणूक काढली आणि जमावबंदी आदेशाचे तसेच साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज तसेच मदन महाराज हरिदास यांच्यासह पाच जणांविरुद्ध पंढरपूर पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. 
दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रेनंतर गोपाळकाल्याच्या दुसऱ्या दिवशी महाद्वार काला परंपरेनुसार होत असतो. यंदादेखील प्रथेप्रमाणे आषाढी यात्रेनंतर सहा जुलै रोजी संत नामदेवांचे वंशज नामदास महाराज यांच्या उपस्थितीत महाद्वार काल्याचा सोहळा झाला. महाद्वार काल्याचे जनक कान्हैया हरीदास यांचे विद्यमान वंशज मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर त्यांच्या देवघरातील श्री विठ्ठलाच्या पादुका ठेवून परंपरेप्रमाणे महाद्वार काल्याचा सोहळा झाला होता. 
फौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम 144 नुसार सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. असे असताना सहा जुलै रोजी दुपारी मदन महाराज हरिदास, श्रीकांत महाराज हरिदास, कांता हरिदास (रा. हरिदास वेस, पंढरपूर), मिलिंद गाताडे (रा. विजापूर गल्ली, पंढरपूर) आणि संत नामदेवांचे वंशज नामदास (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नामदेव मंदिर, पंढरपूर) यांच्यासह इतर सुमारे वीस लोक यांनी जमावबंदी आदेशाचे तसेच साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियमाचे उल्लंघन करून एकत्र जमून महाद्वार काल्याची मिरवणूक काढली. या कारणावरून त्यांच्या विरोधात आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार अरुण राजकर यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. वाघमोडे तपास करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case was registered against the descendants of Saint Namdev Maharaj in Pandharpur