‘सीडीआर’मधून उलगडणार लोहारांचे लागेबांधे! ‘लाचलुचपत’चे पुणे पोलिस अधीक्षकांना पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KIRAN LOHAR
‘सीडीआर’मधून उलगडणार लोहारांचे लागेबांधे! ‘लाचलुचपत’चे पुणे पोलिस अधीक्षकांना पत्र

‘सीडीआर’मधून उलगडणार लोहारांचे लागेबांधे! ‘लाचलुचपत’चे पुणे पोलिस अधीक्षकांना पत्र

सोलापूर : कमिटीला पण पैसे द्यावे लागतात म्हणत चक्क स्वत:च्या कार्यालयातच २५ हजारांची लाच स्वीकारताना प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार रंगेहाथ सापडले. लोहारकडून लाचेच्या प्रकरणात कोणाकोणाचा हात आहे, याचा कसून तपास सुरु आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोहारांचा कॉल डिटेल्स रिपोर्ट (सीडीआर) पुणे पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून मागविला आहे. त्यातून आणखी धक्कादायक वस्तुस्थिती समोर येईल.

कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची सप्टेंबर २०२१ मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. जिल्हा परिषदेच्या शाळांवरील शिक्षकांच्या कामकाजावर त्यांनी नेहमीच ताशेरे ओढले. शालेय कामकाज पाहताना त्यांनी शिक्षकांना शिस्तीचे धडे पण दिले. कामात चोख व शिस्तीचे पालन करणारा शिक्षणाधिकारी म्हणून त्याची पालकांमध्ये ख्याती वाढत होती. त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे काही शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना निवेदने दिली होती. पण, ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसलेंच्या प्रकरणात लोहार खूपच चर्चेत आले. शेवटी लोहारांना नोटीस काढून शांत राहण्याचा सल्ला सीईओ स्वामी यांना द्यावा लागला होता. तरीपण, ते बोलतच राहिले. लाच प्रकरणात सापडल्यानंतर डिसले गुरुजींनी पैसे मागितल्याचा केलेला आरोप खरा होता की काय, असा तर्कवितर्क काढला जावू लागला आहे. तसेच लोहार यांनी लाच घेतलेल्या दिवशी कोणाकोणाला कॉल केले होते, याची माहिती आता ‘सीडीआर’मधून उघड होणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तींची पण चौकशी होईल, असे सूत्रांनी सांगितले. लाचलुचपतचे नूतन पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

अबब..! शिक्षण विभाग भ्रष्टाचाराचा अड्डाच

निवडश्रेणी व ज्येष्ठ शिक्षकाला मुख्याध्यापकाची मान्यता देताना आणि सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व पेन्शन विक्री, ग्रॅज्युएटी, फंडाची रक्कम काढण्यासाठी जागोजागी पैसे द्यावेच लागतात. त्याशिवाय फाईल संबंधित टेबलावरून हालतच नाही. शाळेच्या वर्गवाढीच्या मान्यतेसाठी, यु-डायस प्लससाठी पण पैसे घेतले जातात. प्रत्येक कामासाठी रक्कम ठरलेलीच. साहेब पैसे मागतात, मग कर्मचारी पण निघेल तेवढे काढतात, अशी आवस्था शिक्षण विभागाची झाल्याचे बोलले जात आहे. तसेच लोहार यांच्या १३ महिन्यांच्या कार्यकाळात शिक्षकांच्या बदल्या, शिक्षकांची पदोन्नती, निवडश्रेणी, पेन्शन अशा विविध बाबींची चौकशी होऊ शकते. दरम्यान, एका सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेने काही वर्षांपूर्वी आलेला अनुभव नाव न सांगण्याच्या अटीवर ‘सकाळ’कडे मांडला.