esakal | 'मराठीचे कुणीही वाकडे करू शकत नाही - उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

'मराठीचे कुणीही वाकडे करू शकत नाही - उद्धव ठाकरे

 मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. मुघल आणि इंग्रजही मराठीला संपवू शकले नाहीत. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला तरी शत्रूची पळापळ व्हायची. त्या मराठी भाषेचे वाकडे करण्याची कोणाची टाप आहे,'' असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला.

'मराठीचे कुणीही वाकडे करू शकत नाही - उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. मुघल आणि इंग्रजही मराठीला संपवू शकले नाहीत. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला तरी शत्रूची पळापळ व्हायची. त्या मराठी भाषेचे वाकडे करण्याची कोणाची टाप आहे,'' असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी आज जगभर मराठी भाषा दिन साजरा होत आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने आज विधानभवनात सरकारच्या वतीने मराठी भाषा दिन सोहळा साजरा करण्यात आला. ग्रंथदिंडीने या सोहळ्याची सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय आमदार या सोहळ्यात सहभागी झाले होते. या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नवे स्वीकारताना जुन्याला विसरू नका. मराठी सोबत घेऊन पुढे चला, असे आवाहन उपस्थितांना केले. ''मराठीचा दिवस केविलवाणेपणे साजरा करण्याची गरज नाही. काय होणार मराठीचे ही चिंता करण्याची गरज नाही. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. डोके ठिकाणावर आहे का? असे इंग्रजांना ठणकावून विचारणारी मराठीच होती. असे असताना चिंताग्रस्त भावनेने हा दिवस साजरा का करायचा,'' अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी जुनी असून, दुर्दैवाने अजून ती पूर्ण झालेली नाही. मराठी माणसाला आणि मराठीला संघर्षाशिवाय काही मिळाले नाही, यासाठीही भविष्यात संघर्ष करावा लागेल. 
-  अजित पवार, उपमुख्यमंत्री


मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान महोदयांची आपण सर्वजण भेट घेऊ, महाराष्ट्राच्या साडेतेरा कोटी जनतेची इच्छा त्यांना सांगू. जागतिक भाषेचे विद्यापीठ महाराष्ट्रात व्हावे.
- रामराजे नाईक निंबाळकर, सभापती, विधान परिषद


मराठी आपणच बोलत नसू तर मराठी जगणार कशी? मराठी भाषेविषयीची आपुलकी आपणच दाखवली पाहिजे. मराठीचा जागर, मराठीची भूमिका देश आणि जागतिक पातळीवर पोचवण्याचा संकल्प केला पाहिजे. 
- नाना पटोले, अध्यक्ष, विधानसभा


मराठी ही लोकव्यवहाराची भाषा होती. तिला ज्ञानभाषा करण्याचे काम तेराव्या शतकातील संतपरंपरेने केले. सांस्कृतिक ऊर्जा, प्रभावक्षमता ही मराठीची बलस्थाने आहेत. भारतीय भाषेत ही तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. असे असले तरी भाषेचे चलनवलन वाढणे एवढे मराठीसाठी पुरेसे नाही. ती समाजाचा अंत:स्वर, संस्कृतीची वाहक होणे आवश्यक आहे. हा बदल झाला तर मराठी आणखी प्रभावी  भाषा बनेल यात मुळीच शंका नाही. मराठी भाषा सक्तीची करून शासनाने यादृष्टीने खंबीर पाऊल उचलल्याबद्दल शासनाचे अभिनंदन.
– नीलिमा गुंडी, लेखिका