Sports : जॅकसन, वसावडा यांची शतके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india sports cricket

Sports : जॅकसन, वसावडा यांची शतके

बंगळूर- शेल्डन जॅकसन व अर्पित वसावडा यांनी झळकावलेल्या शानदार शतकांच्या जोरावर सौराष्ट्राने येथे सुरू असलेल्या रणजी करंडकातील उपांत्य फेरीच्या लढतीत पहिल्या डावात ४ बाद ३६४ धावा फटकावल्या आहेत. कर्नाटकने पहिल्या डावात ४०७ धावा केल्या असून सौराष्ट्राचा संघ आता फक्त ४३ धावांनी मागे आहे. त्यांच्याकडे पहिल्या डावात आघाडी घेण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

सौराष्ट्राने २ बाद ७६ या धावसंख्येवरून शुक्रवारी पुढे खेळायला सुरुवात केली. वासुकी कौशिक याने हार्विक देसाई याला ३३ धावांवर बाद करीत सौराष्ट्राला तिसरा धक्का दिला; पण यानंतर शेल्डन जॅकसन व अर्पित वसावडा या जोडीने सौराष्ट्राचा डाव सावरला.

दोघांनी २३२ धावांची भागीदारी करताना कर्नाटकच्या गोलंदाजांचे आव्हान लीलया परतवून लावले. जॅकसन याने २४५ चेंडूंचा सामना करताना १६० धावांची खेळी साकारली. ही खेळी त्याने २३ चौकार व २ षटकारांनी सजवली. कृष्णाप्पा गौतमच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यामुळे जोडी तुटली. अर्पित ११२ धावांवर खेळत आहे. त्याने आपल्या खेळीत १५ चौकार मारले.

संक्षिप्त धावफलक-

कर्नाटक - पहिला डाव सर्व बाद ४०७ धावा (मयांक अगरवाल २४९, श्रीनिवास शरथ ६६, चेतन सकारिया ३/७३, कुशांग पटेल ३/१०९) वि. सौराष्ट्र - पहिला डाव ४ बाद ३६४ धावा (शेल्डन जॅकसन १६०, अर्पित वसावडा ११२, विदवाथ कावेरप्पा २/६४).