esakal | सीईटी परीक्षाप्रक्रियेला सापडेना मुहूर्त! ई-निविदांना स्‍थगिती
sakal

बोलून बातमी शोधा

cet exam

सीईटी परीक्षाप्रक्रियेला सापडेना मुहूर्त! ई-निविदांना स्‍थगिती

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेतल्‍या जाणाऱ्या सीईटी (CET exam) परीक्षांचे नियोजन अधांतरी असल्‍याचे सध्याचे चित्र आहे. चार वेळा मुदतवाढ दिल्‍यानंतर सीईटी सेलतर्फे जारी ई-निविदेला स्‍थगिती देण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. दरम्‍यान, सद्यःस्‍थितीत तरी सीईटी आयोजनाची प्रक्रिया बारगळल्याचेच चित्र बघावयास मिळत आहे. (CET exam process Postponement of tender)

चार वेळा मुदतवाढ दिल्‍यानंतर सीईटी सेलतर्फे निविदेला स्‍थगिती

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्‍यभरात कमी होत असून, इयत्ता बारावीच्‍या परीक्षेच्‍या संदर्भात कुठल्‍याही क्षणी निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. अशात विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षांकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून आहे. परंतु सीईटी सेलच्‍या नियोजनाचा विचार केल्‍यास नियोजन अत्‍यंत संथगतीने सुरू असल्‍याची स्‍थिती आहे. सीईटी सेलतर्फे गेल्‍या २६ मार्चला ई-निविदा जारी केली होती. १२ एप्रिलला निविदा खुल्या केल्या जाणार होत्या. मात्र त्‍यानंतर सातत्‍याने मुदतवाढ देण्यात आली. त्‍यानुसार प्रथम मुदतवाढीत १५ एप्रिल, दुसऱ्यांदा २७ एप्रिल, तिसऱ्या वेळी ४ मे व चौथ्या मुदतवाढीत १७ मेस निविदा खुल्या करण्याचा निर्णय झाला होता. परंतु तत्‍पूर्वीच सीईटी सेलतर्फे निवेदन जारी करत या ई-निविदांना स्‍थगिती दिली आहे. सुधारित निविदा महाटेंडर पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार असल्‍याचे या निवेदनात नमूद केले आहे.

हेही वाचा: रेमडेसिव्हिरनंतर आता 'ॲम्फोटेरिसिन' साठी धावपळ

पुढील प्रक्रिया होणार प्रभावित

निविदा निश्‍चितीनंतर विद्यार्थ्यांना पोर्टलवर नोंदणी, सीईटी परीक्षांकरिता ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागेल. त्‍यासाठी पुरेसा अवधी उपलब्‍ध करून देणे आवश्‍यक असेल. परंतु अद्याप कुठल्‍याच स्‍वरूपाचे वेळापत्रक निश्‍चित नसल्‍याने पुढील प्रक्रिया प्रभावित होण्याची भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा: इथे मृत्यूदर वाढतोय; शहरातील नऊ रुग्णालयांना नोटिसा

पदव्‍युत्तरचे प्रवेशही रखडणार

पदवी अभ्यासक्रमांप्रमाणे काही व्‍यावसायिक पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षाकरितादेखील सीईटी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. बहुतांश विद्यापीठाच्‍या सध्या परीक्षा सुरू असून, ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी विद्यापीठस्‍तरावर प्रयत्‍न केले जात आहेत. अशात अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना पदव्‍युत्तर प्रवेशाकरिता प्रतीक्षा करत बसण्याची वेळ ओढावू शकते.

loading image