कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सीईटी परीक्षा पुढे ढकलल्या 

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 23 June 2020

संपूर्ण देशातील आणि राज्यातील कोरोनाचा वाढता  प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यातील अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी राज्यातील पाच लाख २४ हजार ९०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा ४ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे ही प्रवेश परीक्षा उच्च शिक्षण विभागाला पुढे ढकलावी लागली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सध्या संपूर्ण देशातील आणि राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील, असे ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CET exams postponed due to corona infection