

चेन स्नॅचिंग
सोलापूर : सोलापूर शहरातील अवंती नगरातील तीन महिला मंगळवारी (ता. ७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास वॉकिंगसाठी घराबाहेर पडल्या होत्या. संधीची वाट पाहात थांबलेल्या दुचाकीवरून डबलसीट आलेल्या चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत विजयालक्ष्मी साळवे (वय ६६) या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण हिसकावले. चेन स्नॅचिंग करून दुचाकीवरील चोरटे जुना पूना नाक्याच्या दिशेने पसार झाले. महिलेच्या फिर्यादीवरून त्या दुचाकीस्वारांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
डोक्यावर टोपी घालून आलेले दुचाकीस्वार ६० ते ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून काही सेकंदात दुचाकीवरुन पसार झाले. महिलांनी आरडाओरड केली, तोपर्यंत दुचाकी नजरेआड गेली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस, जोडभावी, जेलरोड पोलिसांची पथके, गुन्हे प्रकटीकरण पथक, शहर गुन्हे शाखेची सात पथके चोरट्यांच्या शोधासाठी घटनास्थळी दाखल झाले. सर्व अधिकाऱ्यांनी परिसरातील सर्वच रोडवरील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी सुरु केली.
काही सीसीटीव्हीत दुचाकी दिसते, पण दुचाकीस्वारांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत टोल नाक्यांसह शहरातील विविध रस्त्यांवरील ‘सीसीटीव्ही’ची पडताळणी सुरु होती. परिसराचा अंदाज घेऊन चेन स्नॅचिंग केलेले दुचाकीस्वार पसार झाले. विशेष बाब म्हणजे दुचाकीला नंबरप्लेट देखील नव्हती. दुचाकीस्वाराने अचानक महिलेच्या गळ्यात हात घातला आणि गंठण हिसकावले. त्यानंतर काही सेकंदात ते पसार झाल्याने दुचाकीस्वारांचा चेहराच त्या महिलांना स्पष्टपणे दिसला नाही. आता पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
मागून सावकाश आले, पुढे गेले अन् माघारी फिरले
तीन महिला जुना पूना नाका ते अरविंद धाम या रोडवर वॉकिंगसाठी आल्या होत्या. दुचाकीवर डबलसीट असलेला दुचाकीस्वार त्या महिलांच्या जवळून सावकाश गेला. कोणत्या महिलेच्या गळ्यात दागिने आहेत, सहजपणे कोणाचे दागिने हिसकावता येतील, याचा अंदाज घेतला. तो दुचाकीस्वार काही अंतरावर जाऊन थांबला. महिला बोलण्यात व्यस्त असल्याची संधी पाहून दुचाकीस्वार परत फिरला आणि तिघींमधील एका महिलेच्या गळ्यात हात घालून दुचाकीवर मागे बसलेल्याने गंठण हिसकावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.