esakal | जावे पंढरीसी आवडे मानसी
sakal

बोलून बातमी शोधा

Vittal

जावे पंढरीसी आवडे मानसी

sakal_logo
By
चैतन्य महाराज देगलूरकर

।। श्रीपांडुरंग।।

आम्ही ज्याचे दास। त्याचा पंढरीये दास।।

तो हा देवाचाही देव। काय कळिकाळाचा भेव।।

असे श्रीतुकाराममहाराजांनी ज्या परमतत्त्वाबद्दल म्हटले आहे, तो परमात्मा श्रीपंढरीनाथ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. प्रतिवर्षी आषाढ महिन्यामध्ये भगवंताचे लाडके डिंगर संतांच्या समवेत अत्यंत उत्साहाने, आनंदाने नाचत, भजन, नामस्मरण करीत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल होतात. पौर्णिमेपर्यंतच्या वास्तव्यामध्ये तीर्थस्नान, कीर्तन-प्रवचन श्रवण, प्रदक्षिणा, संत व भगवद्दर्शन आणि आप्तभेटी हे सर्व नियमाने करतात आणि त्यातून वर्षभराच्या आनंदाचा साठा, पारमार्थिक साधनेची ऊर्जा, प्रपंचातील परिस्थितीशी लढण्याचे मानसिक सामर्थ्य आणि दुःखावेग सहन करण्याचे धैर्य घेऊन जातात. ही वारी आहे, वारकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

या वारीचा वारकऱ्यांच्या जीवनावर कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक परिणाम होत असतो. तो त्यांच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, त्यांचे जीवन अधिकाधिक समृद्ध बनवितो. परंतु, गेली दोन वर्षे दुर्दैवाने, कोरोना महामारीमुळे वारकरी या अद्वितीय, अलौकिक साधनेला आणि त्यातील आनंदाला मुकले आहेत. आज पंढरपूर उदासीन दिसते आहे. एरवी वारीमध्ये वारकऱ्यांनी गच्च भरलेले आणि ओसंडून वाहणाऱ्या आनंदानी भरलेले रस्ते ओस पडले आहेत. वारीत प्रफुल्लित असणारे वाळवंट रिते आहे. चंद्रभागाही उदास आहे. तिचे पाणीही संथ झाले आहे. दिंड्यांबरोबर पंढरीत प्रवेश करतानाचे आणि प्रवेश केल्यानंतरचे नाम, भक्ती, भगवंताच्या रूप, गुण वर्णनाचे अभंग आणि त्यांच्या उत्साहवर्धक परंपरागत चालींनी मौन धारण केले आहे. ज्या पंढरीनाथाला डोळे भरून पाहावयाचे ते डोळे त्याच्या स्मरणाने भरून आले आहेत.

‘जावे पंढरीसी आवडे मानसी।

कधी एकादशी आषाढी हे।।’

याची वर्षभर प्रतीक्षा होती.

श्रीक्षेत्री जाऊन होतील संताचिया भेटी।

आनंदे नाचो वाळवंटी।।

ही अपेक्षा होती. त्यासाठी देवाची प्रार्थना होती आणि असे फळ पदरी पडावे काय? हे दुःख कोणास उमगणार? आणि याही पेक्षा परतवारीच्या निष्ठावंत वारकऱ्यांचे दुःख तर कोणत्या शब्दात मांडणार? हे अनुभवाचि जोगे नोहे। बोलाऐसे।। हेच खरे।। असे दुःख गेली दोन वर्षे वारकरी भोगतो आहे, आणि भरल्या अंतःकरणाने पुनर्भेटीची आणि संतसमागम चालत देवाकडे येण्याची याचना करतो आहे. हे सर्व दुःखद आहे.

हे सर्व दुःखाचा आणि वारकऱ्यांचा एक हृद्य आणि भावस्निग्ध संबंध आहे! वारकरी तत्त्वज्ञान आणि भक्तिशास्रीय वाड्‌मयसंपदेमध्ये संतांनी हे दुःख मागून घेतलेले दिसते. अर्थात हे दुःख केवळ आणि केवळ भगवद्वियोगाचेच आहे! यालाच ‘विरह’ असे म्हटले आहे. भक्तिशास्रामध्ये याला फार महत्त्व आहे. विशेषतः श्रीज्ञानेश्‍वरमहाराजांच्या अभंगांमधून ही विरहिणी फार भावपूर्ण रूपाने प्रकटली आहे, किंबहुना क्षीज्ञानेश्‍वरमहाराजांच्या वाड्‌मयातील तो एक अलौकिक, विलक्षण काव्यप्रकार आहे. गोपिकेच्या भूमिकेतून म्हणजे स्रीभूमिकेतून अनुभवजन्य शब्दांचा हा भावविभोर आविष्कार आहे. गोकूळ सोडून गेलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या विरहाने व्याकूळ झालेल्या गोपिकेचा हा अनुभव आहे. भगवंताच्या भेटीची तीव्रमय तळमळ, भेटीची अलौकिक, अनिर्वचनीय सुख, आणि त्यानंतर त्या सुखाच्या पार्श्‍वभूमीवर भगवंताचा झालेला वियोग अशी ही संधी आहे. यास भक्तिशास्रांमध्ये अनुक्रमे पूर्वराग, मीलन आणि विरह असे म्हणतात. भावप्राबल्याच्या दृष्टीने हे भाव उत्तरोत्तर श्रेष्ठ मानले आहेत. म्हणजे पूर्वरागापेक्षा मीलन आणि मीलनापेक्षा विरह अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून साहित्यदर्पणामध्ये म्हटले आहे,

संगम विरह विकल्पे वरमिह विरहो न संगमस्तस्याः।

संगे सैव तथैका त्रिभुवनमपि तन्मयं विरहे।।

म्हणजे, भगवंतांनी संगम आणि विरह प्राप्तीचा विकल्प दिला तर विरहच मागावा, कारण मीलनामध्ये प्रियतम एकाच ठिकाणी प्राप्त होतो. पण विरहामध्ये सर्व विश्‍वच प्रियतममय होऊन जाते. त्यामुळे सर्वत्र तोच दिसू लागतो, अखंड त्याचेच चिंतन घडू लागते.

बाप रखुमादेविवरू विठ्ठराये। माझे सबाह्याभ्यंतरी व्यापिले गे माये।।

असे श्रीज्ञानेश्‍वरमहाराज म्हणतात. अशी विरहाचे भक्तिशास्राने भावी, वर्तमान आणि भूत विरह असे प्रकार सांगितले आहेत.

त्यामधील भूतविरहाच्या दहा अवस्थांमधील शेवटची अवस्था ‘मृत्यू’ अशी सांगितली आहे. येथे ‘मृत्यू’ म्हणजे भक्ताचा साक्षात्‌ मृत्यू किंवा अंत होत नसून मृत्यूसदृश अवस्था त्यांस प्राप्त होते. त्याचे प्राण निघून जात नाहीत, पण जणू जातील असे त्यांस वाटते.

नंदनंदनु घडी घडी आणा। तयावीण न वाचती प्राणा वो माये।

बाप रखुमादेविवरू विठ्ठलु गोविंदु। अमृतपान गे माये।।

अभी भक्ताची अवस्था होते.

हा विरह कष्टप्रद असतो. पण पुनर्भेटीच्या आशेने, पुनर्मीलनाच्या उत्कंठेने ते प्राण सांभाळले जातात. उत्कंठा आणि उत्कंठेची पराकाष्ठा विरहातच होत असते असा भक्तिशास्रीय सिद्धांत आहे.

गेली अनेक वर्षे मीलनाचे सुख भोगून आज वारकरी विरहाच्या अवस्थेमध्ये आहे. या विरहावस्थेमध्ये होणाऱ्या अखंड भगवच्चिंतनामध्ये मग्न आहे.

पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणां होय उणे।

तैसे माझे जिणे एका विठ्ठले वीण।।

अशी त्याची अवस्था आहे. पण केवळ पुनर्मीलनाच्या उत्कंठेने तो घरी थांबला आहे. पण वारकऱ्यांची पुढची परमात्मा श्रीपंढरीनाथाची भेट अधिक उत्कट, अनुपम आणि अनिर्वचनीय असणार आहे, यांत शंका नाही. जत्रेत हरवलेले मूल ज्या उत्कटतेने आईला जसे घट्ट बिलगते तसाच वारकरी भगवंतास भेटेल आणि ते ही ‘असेच भेटावे’ असे शिकविणाऱ्या संतांच्या साक्षीने!

सध्या मात्र वारकरी आर्ततेने संतांस आणि भगवंतास एवढेच आळवितो आहे,

जीवीचिया जीवा प्रेमभावाचिया भावा।

तुजवाचूनि केशवा अनु नावडे।।

जीवे अनुसरलिये अजुनि का न ये।

वेगी आणावा तो सये प्राणु माझा।।

loading image