राज्यात आज हलक्‍या पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

पूर्व आणि उत्तरभारतात पावसाला सुरुवात होण्याची शक्‍यता आहे.महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे

पुणे - राज्याच्या बहुतांश भागांत मॉन्सूनच्या पावसाने उघडीप दिली आहे. येत्या मंगळवारी (ता. 23) कोकण, विदर्भासह राज्यात पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, अशी शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

उत्तर पंजाबपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या पट्ट्याचा पूर्व भाग उत्तरेकडे सरकत आहे. तसेच, ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षिण दिशेकडे झुकणार असल्याने मॉन्सूनची रेंगाळलेली वाटचाल सुरू होण्यास पोषक हवामान होत आहे. पूर्व आणि उत्तर भारतात पावसाला सुरुवात होण्याची शक्‍यता आहे, तर दक्षिण भारतातील राज्यातही पाऊस वाढणार आहे. महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिम किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रात जोरदार वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of light rain in the state today