अवकाळीचे संकट; पुढील तीन तासात महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

मध्य महाराष्ट्रातील सोलापूर तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीत जिल्ह्यातही पावसाचा हलक्या सरी पडतील असा अंदाज दिला आहे. 

पुणे : राज्यावर आजही अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. पुढील तीन तासांमध्ये मराठवाड्यातील जालना, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. यात गारपीटीचाही इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीत जिल्ह्यातही पावसाचा हलक्या सरी पडतील असा अंदाज दिला आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

विदर्भ, मराठवाड्यात गारपीट
विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला गेले दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यानंतर आज पुन्हा अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढले. सातारा, जालन्यात गारांचा पाऊस पडला. कोकणातही रत्नागिरी, सिंधुदूर्गातही जोरदार पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे हरभरा, गहू, ज्वारी पिके आडवी झाली असून, द्राक्षे, डाळिंब या फळबागा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाचा पिकांना दणका
सध्या गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांची काढणी सुरू आहे. सोलापूर, सातारा, सांगली, पुणे भागांत द्राक्षे काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि गारा पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. साताऱ्यातील मोळ, डिस्कळ, कवठे अशा काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. सोलापूरातील पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापुरातील द्राक्ष उत्पादकांनाही चांगला फटका बसला. अमरावतीतील धामणगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.

का आला आहे अवकाळी पाऊस?
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात दोन-तीन दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात दिवसभर ऊन पडत असले, तरी अधूनमधून होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. सायंकाळनंतर काही प्रमाणात ढग भरून येत असल्याने वातावरणात वेगाने बदल होत आहे. बुधवारी रात्री तुरळक ठिकाणी सरी पडत असल्या, तरी गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बुलडाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांत अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातही जालना, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांत पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतही अवकाळी पावसाने हजेरी लावली. नगर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागांत ढगाळ वातावरण होते. कोकणातही ऊन आणि सावल्यांचा खेळ सुरू होता.

राज्यात आजही अवकाळी पाऊस
मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, कर्नाटक ते उत्तर केरळ या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. तर मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग आणि विदर्भ या परिसरांत चक्रिय स्थिती सक्रिय आहे. यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसासाठी पोषक स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी सरी बरसत आहे. आजही (शुक्रवारी) राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडेल. उद्यापासून (शनिवार) ढगाळ वातावरणासह अधूनमधून ऊन पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे.

येथे पावसाचा अंदाज
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ

पावसाचा दणका
- पालीत अवकाळी पावसासह गारांचा वर्षाव
- पावसामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंता
- नागपूर शहरात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस
- संगमेश्‍वर, गुहागरसह रत्नागिरी व लांजा तालुक्‍यातही मुसळधार पाऊस
- गुहागरात आंबा, काजूचे नुकसान
- नाशिकमध्ये गारांच्या दणक्याने द्राक्षे फुटली अन कांद्याचे नुकसान
- बुलडाणा जिल्ह्यात तांदूळवाडी येथे एकाचा वीज पडून मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of rain in these districts of the state in next three hours