Shivsena: "अब्दुल सत्तार आमच्या पाया पडायचे पण त्यांना आता मस्ती आलीये" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abudl Sattar

Shivsena: "अब्दुल सत्तार आमच्या पाया पडायचे पण त्यांना आता मस्ती आलीये"

राज्याच्या राजकारणात सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. ते आज शेतकाऱ्यांशी संवाद साधून पाहणी करणार आहेत. अशातच खैरे विरुद्ध सत्तार अशी लढत पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे 24 मिनिटाच्या दौऱ्यात नुकसानीची कशी पाहणी करणार अशी टीका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उत्तर दिलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी किती ठिकाणी पाहणी केली याचे उत्तर अब्दुल सत्तार यांनी आधी द्यावे, असा टोला खैरे यांनी लगावला आहे.

खैरे उत्तर देताना म्हणाले की, राज्यात इतका मोठा पाऊस पडला. या परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किती ठिकाणी जाऊन पाहणी केली असा प्रश्न खैरे यांनी विचारला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात गुंग आहेत. तर कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणतात मी 69 ठिकाणी जाऊन आलो, पण जाऊन काय करून आलेत. ज्या ठिकाणी जाऊन आले त्या शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही असे सांगत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच निवडून आले आहेत हे सत्तार यांनी विसरू नयेत असा टोला देखील चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.

अब्दुल सत्तार निवडणुकीत निवडून येण्यासाठी माझे आणि उद्धव ठाकरे यांच्या पाया पडायचे. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आणा म्हणत पाया धरायचे. आता अब्दुल सत्तार यांना मस्ती आहे. या पक्षातून त्या पक्षात फिरण्याची सवय त्यांना असून, आता कोणत्या पक्षात जातील माहित नाही. त्यामुळे आता आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.