
"यासारखे दुःख आयुष्यात..."; 'त्या' विधानाने चंद्रकांत पाटील व्यथित
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका होत होती. यासोबतच त्यांच्या माफीनाम्याची मागणीही होत होती. यावरूनच आता चंद्रकांत पाटलांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहित आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. (Chandrakant Patil Supriya Sule)
राज्य महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रात चंद्रकांत पाटील म्हणतात, "आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप, सावली, आई, संवेदना आणि वात्सल्यसारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही. माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्याने मी त्रासाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो".
हेही वाचा: वादंग उठल्यानंतर चंद्रकांत पाटील नमले; सुप्रिया सुळेंबद्दल म्हणाले...
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
ओबीसी आरक्षणावरुन राज्यात वादंग सुरू असतानाच चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या विधानामुळेही खळबळ माजली होती. चंद्रकांत पाटील म्हणाले होते, "कशाला राजकारणात राहता. घरी जा, स्वयंपाक करा, खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या"
Web Title: Chandrakant Patil Supriya Sule Maharashtra State Women Committee Rupali Chakankar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..