मोठी बातमी ! "वनसेवा' उमेदवारांच्या मुलाखतीच्या तारखांत बदल; 'या' दिवशी होणार मुलाखती 

तात्या लांडगे
बुधवार, 8 जुलै 2020

मुलाखतीचे वेळापत्रक 

 • मुंबई : 4 ऑगस्ट 
 • नागपूर : 6 ते 7 ऑगस्ट 
 • पुणे : 10 ते 14 ऑगस्ट 
 • औरंगाबाद : 17 ते 18 ऑगस्ट 
 • नाशिक : 20 ते 21 ऑगस्ट 

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वनसेवा विभागाच्या मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या 322 उमेदवारांची नावे अंतिम केली. यांच्या मुलाखती 20 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत होणार होत्या. मात्र, आयोगाने आता प्रशासकीय कारण देत ही परीक्षा 4 ते 21 ऑगस्ट या कालावधीत घेण्याचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

 

वनसेवा उमेदवारांची पूर्व परीक्षा 26 मे 2019 रोजी पार पडली. त्यानंतर 19 सप्टेंबरला मुख्य परीक्षा झाली. तेव्हापासून मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी निवडलेल्या 322 उमेदवारांना मुलाखतीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. तत्पूर्वी, आयोगाने 20 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत मुलाखती घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, प्रशासकीय कारण पुढे करीत आयोगाने आता त्यात पुन्हा बदल केला आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला असून या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक वर्षाची सुरवातच लॉकडाउनमध्ये झाली आहे. कोरोनामुळे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसह अन्य परीक्षा रद्द कराव्या लागल्या. या पार्श्‍वभूमीवर एमपीएससीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षांचे वेळापत्रकही दोनदा पुढे ढकलावे लागले होते. दुसरीकडे मागील वर्षीच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निकालही लांबला होता. आता आयोगाने पुणे, औरंगाबाद, नाशिक या केंद्रावरील मुलाखतीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. तर मुंबई व नागपूर या केंद्रांवरील मुलाखती पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. 

मुलाखतीचे वेळापत्रक 

 • मुंबई : 4 ऑगस्ट 
 • नागपूर : 6 ते 7 ऑगस्ट 
 • पुणे : 10 ते 14 ऑगस्ट 
 • औरंगाबाद : 17 ते 18 ऑगस्ट 
 • नाशिक : 20 ते 21 ऑगस्ट 
 •  

कोरोनाचे नव्हे तर आयोगाने दिले प्रशासकीय कारण 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध परीक्षांचे वेळापत्रक अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. अशा परिस्थितीत वनसेवेच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र ठरलेल्या 322 विद्यार्थ्यांच्या मुलाखती 20 जुलैपासून सुरु करण्याचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले होते. मात्र, आयोगाने कोरोनाचे कारण न देता आता प्रशासकीय कारणास्तव त्यात बदल करण्यात आल्याचे स्पष्ट केल्याने विविध प्रश्‍न उपस्थित होत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in interview dates of forest service candidates