
मराठा आरक्षण : कोल्हापुरात उद्यापासून आंदोलन; स्वरुप कसं?
कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्नी उद्या (ता. १६) होणारे मूक आंदोलन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा विचार जगभरात पोचविण्यासाठी मोठी संधी आहे, असे प्रतिपादन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक वागणूक देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा समाजाने सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. सकल मराठा समाजातर्फे नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारक परिसरात आयोजित मूक आंदोलनाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत ते बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले, 'राजर्षी शाहू महाराज यांनी मराठा समाजासह अन्य समाजांना आरक्षण दिले होते. कालांतराने मराठा समाज आरक्षणाच्या प्रवाहातून हद्दपार झाला. आज गरीब मराठा समाज हलाखीचे जीवन जगत आहे. त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर आरक्षण मिळवून द्यावे लागेल. त्यासाठी आता लोकप्रतिनिधी काय करणार, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. मराठा आरक्षणावर समाज याआधीच बोलला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आरक्षणासाठी काय करणार, हे सांगणे आवश्यक आहे.'
ते म्हणाले, 'शाहू महाराजांनी इथल्या पेठां-पेठांत स्वाभिमानाचे अंकुर फुलवले. कोल्हापुरातल्या पेठांची ताकद वेगळी आहे. या पेठांतील मराठा बांधव कोल्हापूरकर म्हणून एकत्र घेऊन आंदोलनात सहभागी होत आहेत. उद्या मूक आंदोलन होत असून मोर्चा काढून लोकांना वेठीस धरायचे नाही. गरज पडली तर पुणे ते मुंबई मंत्रालय लॉंग मार्चची आमची तयारी आहे."
अजित राऊत म्हणाले, 'संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन आंदोलन होत आहे. याचे सर्वांनी भान ठेवावे. जर कोणाला वेगळी चूल मांडायची असेल तर त्याने आताच आंदोलनातून बाहेर पडावे. आंदोलनाची आचारसंहिता प्रत्येकाने पाळणे आवश्यक आहे.' याप्रसंगी प्रा. जयंत पाटील, बाबा इंदूलकर, सुजित चव्हाण, विनायक फाळके, महेश जाधव, काका खाडे, राजू सावंत, आर. के. पोवार, अजित कदम, दिलीप देसाई, जयेश कदम, लाला गायकवाड, सुरेश जरग, दिगंबर फराकटे, धनंजय सावंत, प्रसाद जाधव, दुर्गेश लिंग्रज, अनिल घाटगे, राजू जाधव, पुंडलिक जाधव, भाऊ घोडके, सचिन घोरपडे, प्रवीण हुबाळे, संग्राम यादव, स्वप्निल पार्टे, संदीप चौगुले, संदीप पाटील, बाबा महाडिक, निलेश साळोखे हेमंत साळोखे, शाहीर दिलीप सावंत, शहाजी माळी, संजय पोवार, सचिन तोडकर, बाबा पार्टे, निवास साळोखे, कमलाकर जगदाळे, चंद्रकांत चिले, राजू लिंग्रस, प्रसन्न मोहिते, सत्यजित आवटे, सम्राट कारंडे, उदय घोरपडे, रमेश मोरे, इंद्रजित सावंत, अजय पाटील, चंद्रकांत पाटील, उदय भोसले, किशोर घाटगे, दीपक काटकर, प्रदीप थोरवत, हर्षल सुर्वे उपस्थित होते. फत्तेसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले.
उद्या (ता. १६) मोर्चा नव्हे तर मूक आंदोलन आहे. आमदार, खासदार व मंत्री यांना सन्मानपूर्वक बोलाविण्यात आले असून, केवळ जिल्ह्यातील तालुका समन्वयकांनी आंदोलनस्थळी हजेरी लावावी. शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.