बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांसाठी 'या' पर्यायांची पडताळणी! उच्च शिक्षणमंत्री म्हणाले...

तात्या लांडगे
Tuesday, 23 June 2020

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले...

  • प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने घेतला हिताचा निर्णय
  • राज्यातील अकृषिक विद्यापीठांकडून फॅकल्टी व सत्रनिहाय मागविली बॅकलॉग विद्यार्थ्यांची माहिती
  • बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेण्यापूर्वी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी पुन्हा होईल बैठक
  • विधी व न्याय विभागातील तज्ज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा घेतला अभिप्राय
  • तज्ज्ञांचा अभिप्राय आणि कुलगुरुंची मते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवले जाईल
  • विद्यार्थी हिताचा निर्णय होईल; घाईगडबीत निर्णय झाल्यास सरकारवर कायमचा ठपका नको

सोलापूर : राज्यातील 14 सार्वजनिक विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षात प्रवेशित असलेले अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे सात लाख 34 हजार 516 विद्यार्थी तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे दोन लाख 83 हजार 937 विद्यार्थी आहेत. त्यापैकी पावणेतीन लाख विद्यार्थी बॅकलॉग व एटीकेटीमधील आहेत. अंतिम वर्षातील परीक्षा रद्द झाल्या, मात्र बॅकलॉग व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा निर्णय झालेला नाही. त्यासाठी आता विधी व न्याय विभाग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभिप्राय घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

राज्यातील कोणत्या विद्यापीठांमध्ये कोणत्या अभ्यासक्रमाचे किती विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग राहिले आहेत. तसेच किती विद्यार्थी एटीकेटीने पुढच्या वर्गात प्रवेशित झाले आहेत, याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मागविली आहे. त्यानुसार विद्यापीठांनी सोमवारी (ता. 22) शासनाला माहिती पोहच केली आहे. तत्पूर्वी, शासनाने विधी व न्याय विभागातील आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभिप्रायही घेतला आहे. आता राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुसमवेत बैठक घेतली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग व राज्यस्तरीय समितीने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार बॅकलॉग व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा महाविद्यालये नियमित सुरु झाल्यानंतर 120 दिवसांत घेण्याचे ठरले. मात्र, राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता महाविद्यालये कधीपासून सुरु होतील हे अनिश्‍चितच आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकार बॅकलॉग व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी ठोस पर्याय काढत आहे.

'या' पर्यायांची केली जातेय पडताळणी

  • प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण विषयांतील गुणांच्या सरासरीवरुन गुण देता येतील
  • अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना संबंधित विषयाच्या व्हायवा तथा प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून उत्तीर्ण करता येईल
  • ज्या विद्यार्थ्यांना तो फॉर्म्यूला अमान्य असेल, त्यांना अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांप्रमाणे संबंधित विषयांची फेरपरीक्षा देता येईल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Check out the options for backlog students The Minister of Higher Education said