राष्ट्रवादीचे आणखी दोन माजी प्रदेशाध्यक्ष करणार पक्षांतर? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषविलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये तर आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेत आपले राजकीय भवितव्य सुरक्षित केले आहे. 

मुंबई : छगन भुजबळ, भास्कर जाधव यांच्या पक्षांतराच्या चर्चेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांचाच पक्षावर विश्वास उरला नसल्याचे चित्र समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या दोन माजी प्रदेशाध्यक्षांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी प्रदेशाध्यक्षांना आता राष्ट्रवादीचे वावडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून भुजबळ आणि जाधव यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाबाबत वृत्त येत आहेत. परंतु, या दोघांनी शिवसेना प्रवेशाचा इन्कार केला आहे. भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष आहेत. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर भुजबळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सोपविण्यात आली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपविण्यात आले होते. आता हे दोन्ही माजी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीत नाराज असल्याचे बोलले जाते. 

भुजबळ यांच्याकडून राष्ट्रवादीची सूत्रे स्वीकारणाऱ्या बबनराव पाचपुते यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणूक तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच गेली निवडणूक त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली होती. आता अलीकडे मधुकरराव पिचड या माजी प्रदेशाध्यक्षांनीही भाजपमध्ये जाणे पसंत केले. पाचपुते, पिचड यांच्या पाठोपाठ भुजबळ, जाधव यांच्या पक्षांतराची शक्यता व्यक्त होत आहे. 

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेल्या मंदा म्हात्रे २०१४ मध्ये तर चित्रा वाघ अलीकडेच भाजपत दाखल झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदाचा राजीनामा न देता सचिन अहिर यांनी आपल्या हातात शिवबंधन बांधून घेतले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषविलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये तर आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेत आपले राजकीय भवितव्य सुरक्षित केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal and bhaskar jadhav may leave NCP Discussion in Politics