राज्याभिषेकानंतर १५ दिवसांतच संभाजी महाराजांनी औरंगाबादवर हल्ला केला होता

आपला राज्याभिषेक झाल्यावर १५ दिवसांतच बुऱ्हाणपूरची लूट करून आणि औरंगाबादवर हल्ला करून मुघलांना हादरा दिला होता.
Chhatrapati Sambhaji Maharaj
Chhatrapati Sambhaji MaharajSakal

स्वराज्याचे धाकले छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. त्यांच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाणे शत्रूला स्वराज्याकडे वाकडी नजर करून बघायची हिंमत झाली नाही. राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी लगेच बुऱ्हाणपूरची लूट केली आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती काय करू शकतात याचा ट्रेलर मुघलांना दाखवला होता. १६८९ मध्ये त्यांची औरंगजेबाने हत्या केली होती. पण संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेकानंतर फक्त १५ दिवसांतच मुघलांचा बालेकिल्ला असलेल्या त्यावेळच्या खडकी आणि आत्ताच्या औरंगाबाद शहरावर हल्ला केला होता.

१६ जानेवारी १६८१ चा दिवस. संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर दुसऱ्याच वर्षी स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली आणि त्यांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. आपल्या राज्याभिषेकानंतर लगेच त्यांनी आपल्या पराक्रमाचा जलवा दाखवायला सुरूवात केली. १६ जानेवारीला राज्याभिषेक झाला आणि ३१ जानेवारी १६८१ रोजी त्यांनी मुघलांचं दक्षिणेकडील प्रवेशद्वार आणि सुरतेसारखं व्यापारी केंद्र असलेल्या बुऱ्हाणपूरवर छापा टाकला. छत्रपती शिवरायांनी मुघलांचं परदेशी व्यापारी केंद्र असलेल्या सुरतेवर दोन वेळा छापा टाकून कोट्यावधींची लूट केली होती. तो सगळा पैसा त्यांनी स्वराज्यासाठी खर्च केला. पण संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर पंधराच दिवसात अनपेक्षितपणे बुऱ्हाणपूरवर छापा टाकून मुघल सम्राज्याला हादरा दिला होता. एवढंच नाही तर त्याचवेळी मराठा सरदारांनी औरंगाबादेवर हल्ला करूनही आपल्या पराक्रमाने मुघलांच्या नाकी नऊ आणले होते.

Maratha Empire Attack
Maratha Empire AttackSakal

संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपुरावर छापा टाकायची योजना आखली. रायगडापासून बुऱ्हाणपूर जवळपास ५०० किमी अंतरावर. स्वराज्याच्या थोरल्या महाराजांनी सुरतेवर दोन वेळा छापा टाकून कोट्यावधी होनांची लूट घेऊन मुघलांना चांगलाच धडा शिकवला होता. पण पुन्हा मुघलांच्या दक्षिणेकडील महत्त्वाच्या आणि व्यापारी शहरावर छापा टाकण्याचं धाडस संभाजी महाराजांनी केलं होतं. बुऱ्हाणपुराची लूट करणे म्हणजे शत्रूच्या गोटात जाऊन तोंडातला घास हिसकावुन घेण्यासारखं होतं पण ते शिवधनुष्य संभाजी महाराजांनी पेललं. बुऱ्हाणपुरचा सुभेदार त्यावेळी बहादुरखान होता. तो त्याच्या भाच्याच्या लग्नाला आपल्या मुलीसोबत जात असल्याची माहिती महाराजांना मिळाली होती. त्याने बुऱ्हाणपुरात ३००० सैन्य ठेवले अन् आपल्यासोबत ५००० सैन्य घेऊन औरंगाबादला भाच्याच्या लग्नाला रवाना झाला होता.

बुऱ्हाणपुरात फक्त ३००० सैन्य होते. ती संधी साधून महाराजांनी आपले मामा सरसेनापती हंबीररावांना १५ हजारांचे सैन्य घेऊन पुढे पाठवले आणि ते आपल्यासोबत ४ हजारांचं सैन्य घेऊन दुसऱ्या रस्त्याने बुऱ्हाणपुराला पोहोचले. बुऱ्हाणपुरात फक्त तीन हजार सैन्य असल्याने त्यांना जास्त विरोध झाला नाही. त्यांनी तीन दिवस बुऱ्हाणपूर मनसोक्त लूटले. सुरत, दिल्ली यासारख्या व्यापारी शहरांसारखं हे मुघलांचं मोठं शहर होतं त्यामुळे हिरे, सोने, चांदी अशी मिळून संभाजी महाराजांनी जवळपास दोन कोटींची लूट जमा केली. या लुटीचा संदेश औरंगाबादला बहादुरखानला पोहोचला आणि तो तात्काळ औरंगाबादेतील सैन्य आपल्यासोबत घेऊन निघाला. त्याने आपल्यासोबत औरंगाबादचे २० हजार सैन्य घेतले आणि संभाजी महाराजांच्या परतीच्या वाटेवर त्यांना आडवा गेला.

Burhanpur
BurhanpurSakal

दरम्यान इकडे महाराजांनी आपल्या सैन्याचे तीन भाग करून त्यांना लूट घेऊन वेगवेगळ्या वाटेने स्वराज्याकडे रवाना केले. बहादुरखान महाराजांच्या परतीच्या वाटेवर बसला होता पण त्याच्या हाताला काहीच लागलं नाही. कोट्यावधीची लूट महाराजांनी दुसऱ्या मार्गाने सुखरूपपणे स्वराज्याकडे रवाना केली होती. बहादुरखान औरंगाबादचे २० हजार सैन्य घेऊन आपल्यासोबत आला होता पण त्याचवेळी औरंगाबादमध्ये खूप कमी सैन्य होते. हीच संधी साधून मराठा सरदार सुर्याजी जखडे यांनी पैठण मार्गे औरंगाबादेवर हल्ला केला.

सुर्याजी जखडे यांच्याकडे ७ हजाराची फौज होती. या फौजेनिशी त्यांनी औरंगाबादेवर हल्ला केला खरा पण ही बातमी बहादुरखानाला कळल्यावर त्याने आपला मोर्चा परत औरंगाबादकडे वळवला. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती बहादुरखानाची झाली होती. त्याने २० हजारांचे सैन्य घेऊन औरंगाबादेकडे धाव घेतली आणि सरदार सुर्याजी जखडे यांना माघार घ्यावी लागली होती.

Attack
AttackSakal

या हल्लातून आणि लुटीतून महाराजांनी बहादुरखानाला चांगलाच धडा शिकवला होता. यात महाराजांनी जवळपास २ कोटी रुपयांची लूट मिळवली. बुऱ्हाणपुरसारख्या व्यापारी शहराची लूट झाल्यावर औरंगजेबाने बहादुरखानाला सुभेदारपदावरून हटवले. संभाजी महाराजांच्या रणनीतीचा, गनिमी काव्याचा आणि पराक्रमाचा मुघलांनी एवढा धसका घेतला की, पुढच्या आठ वर्षे मुघलांना स्वराज्याच्या सीमा ओलांडता आल्या नाही. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर दक्षिण काबीज करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला स्वराज्यात प्रवेश करण्यासाठी पुढचे आठ वर्षे झुरावं लागलं होतं. स्वराज्य गिळंकृत करून सर्व जगाचा ताबा मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी याच मराठी मातीत गाडले होते. अशा पराक्रमी वीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा !!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com