Bhagat Singh Koshyari : कोश्यारी सरकारलाही नकोसे; आमदार नेमण्यात अडचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari

Bhagat Singh Koshyari : कोश्यारी सरकारलाही नकोसे; आमदार नेमण्यात अडचणी

बीड : शिवरायांसह राष्ट्रपुरुषांबद्दलच्या वक्तव्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेकदा टिकेचे धनी झाले. औरंगाबादेतील वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात अगदीच रान पेटले आहे. याच दरम्यान भाजपचे भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि पर्यटन मंत्री मंगलप्रसाद लोढांची वक्तव्यामुळेही गदारोळ माजला. पण, सफाई देताना भाजपने केवळ राज्यपालांना केंद्रस्थानी ठेवत त्रिवेदी व लोढांबद्दल शब्दही उच्चारला नाही. त्याचे कारणही तसेच असून आता राज्यपाल कोश्यारी भाजपलाही एकार्थाने नकोसे झाले आहेत. भाजपसाठी मागच्या काळात अनेकदा नियमांवर बोट ठेवून तत्कालिन महाविकास आघाडी सरकारला अडचणींत आणले. सरकार गेले पण विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नेमणूका झाल्याच नाहीत. आता याच भगतसिंह कोश्यारींकडून सरकारला त्यांच्या समर्थकांची राज्यपालांकडून विधान परिषदेवर नेमणूक केली तर पक्षपातीपणा या गदारोळात पुन्हा पक्षपातीपणा ठळक दिसेल व त्याचा फटका सरकारला बसेल याची चाणाक्ष सरकारला जाण आहे.

त्यामुळे गुजरात निवडणुकीनंतर व राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर कोश्यारींना नारळ मिळू शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कायम पक्षपातीपणाचे आरोप झाले. त्या काळातही श्री. कोश्यारी यांनी राष्ट्रपुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ते आरोपांच्या पिंजऱ्यात अडकले. रातोरात राष्ट्रपती राजवट हटवून पहाटेचा शपथविधी, विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची विधान परिषदेवर निवड अशा अनेक मुद्द्यांत राज्यपालांनी कायद्यावर बोट ठेवले. त्यामुळे त्यांच्याबद्दल भाजपचे राज्यपाल असे आरोप व टिका झाल्या. त्यांना हटविण्याची कायम मागणी होत राहीली. अलीकडे त्यांनी पुन्हा औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन ते टिकेचे धनी होत आहेत.

याच काळात भाजप प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी व नुकतेच मंत्री मंगलप्रसाद लोढा यांनीही शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरुन टिका होत आहे. खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींसह शिवप्रेमी व समाज आक्रमक झाले आहेत. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपने केवळ राज्यपाल अधोरेखीत केले आहेत. मंत्री लोढा व त्रिवेदींना मात्र पिंजऱ्याच्या बाहेर ठेवले आहे. याचा अर्थ साफ आहे की कोश्यारींना हटवून वातावरण निवळायचे व समाजभावना आपल्याबाजूला घेण्याचे नियोजन आहे. मात्र, ज्या कोश्यारींनी आघाडी काळात राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नेमणूका केल्या नाहीत त्यांच्याच हाताने आपल्या समर्थकांच्या नेमणूका करण्याने नव्याने टिका व आरोप सरकारला नको आहेत. आगामी अधिवेशनात सरकारला वरिष्ठ सभागृहात आपले संख्याबळ वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कोश्यारींना असाही नारळ द्यायचा आणि आम्ही समाज भावनेची कदर करतो, उदयनराजे व संभाजीराजेंच्या मतांचा आदर करतो हे दाखवून द्यायचे व लोढा व त्रिवेदींचा विषय बाजूला ठेवायचा अशी यामागे खेळी आहे.