माझ्यासाठी मंत्री सत्तेतून पायउतार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Eknath Shinde thanks the MLAs

माझ्यासाठी मंत्री सत्तेतून पायउतार

मुंबई - ‘‘आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. कारण एका बाजूला सत्ता, देशपातळीवरील नेते आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा एकनाथ शिंदे असतानाही आठ ते नऊ मंत्री सत्तेतून पाय उतार झाले. पन्नास लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून साथ दिली. त्यांचे खरे आभार मानले पाहिजेत,’’ असे उद्‌गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सभागृहात काढले.

जबरदस्ती केलेली नाही

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विजयी झालेले भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी शिवसेनेला सुनावण्याची संधी सोडली नाही. ‘‘आमच्याबरोबर असलेले काही आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असे पक्षाचे अनेक नेते सांगत होते. त्या आमदारांची नावे सांगा त्यांना सन्मानाने परत पाठवून देईन, असे उत्तर मी त्यांना त्यावेळी दिले होते. परंतु शेवटपर्यंत ही नावे आली नाहीत. त्यामुळे कोणावर जबरदस्ती केली किंवा धाक दाखवला, असा प्रयत्न झालेला नाही.’’

भाजपकडे ११५ सदस्य असतानाही आणि माझ्यासोबत ५० सदस्य असतानाही माझ्या मुख्यमंत्रिपदाला समर्थन दिले. त्याबद्दल त्यांचे आभार. आमच्या वैचारिक भूमिकेला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठिंबा दिला. हे खरे तर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना आहे.

नार्वेकर सर्वांना समान न्याय देतील

राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ‘हे सरकार पारदर्शकपणे कार्य करेल. सभागृहात कोणत्याही सदस्यांवर अन्याय होणार नाही, वेळप्रसंगी समज देऊन योग्य मार्गदर्शन आपण कराल,’’ अशी अपेक्षा ही शिंदे यांनी व्यक्त केली.

न्यायदानाचे काम करतील

‘‘राज्यातील आणि देशात विधानसभेचे सर्वांत तरुण अध्यक्ष असलेल्या ॲड. राहुल नार्वेकर यांच्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग सर्व समाजाला आणि सरकारला होणार आहे,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांचे अभिनंदन केले.राज्याच्या सर्व नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची संधी त्यांना मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ते मार्गदर्शन करतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. कोणत्याही अडचणी, प्रश्न सोडविण्याची क्षमता या सभागृहात आहे. त्यामुळे दोन्ही बाजू समजून घेऊन त्या विषयाला न्याय देण्याचे कार्य नार्वेकर करतील अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

कायद्याच्या लढाया लढणार

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही नार्वेकर यांना शुभेच्छा देऊन सभागृहात राज्याच्या सर्व प्रश्नांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तुमचा इतिहास पाहता दोन्ही बाजू तुमच्या जवळच्या आहेत. कायद्याच्या अनेक लढाया यापुढे लढल्या जाणार आहेत. त्यासाठी न्यायाची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

पक्षादेश डावलल्याची खंत

शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी अध्यक्षांचे अभिनंदन करतानाच किती काळ या पदावर बसतील याविषयी शंका व्यक्त केली. ‘‘३९ आमदारांनी आमच्या पक्षदेशाचे पालन न करता आमच्या विरोधात मतदान केले ही खंत आहे. जनतेच्या मनातही ही खंत राहणार आहे,’’ असे प्रभू यावेळी म्हणाले.

Web Title: Chief Minister Eknath Shinde Thanks The Mlas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..