
केंद्र सरकार हे परदेशातील नसून तेही आपलेच
केंद्र सरकार हे आपलेच असून नैसर्गिक आपत्तीच्या काळात राज्यांना मदत करण्याचे काम आजवर झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागण्यात काही गैर नाही. विरोधकांनी कोणतेही राजकारण त्यात आणू नये, मदतीसाठी सर्वांनी एकत्रित यायला हवे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोलापुरात व्यक्त केली.
सोलापूर : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारही अर्थसहाय करणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. 16) मला फोन केला होता, अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोलापुरात दिली.
राज्यातील अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा व पुण्यातील काही भागांना मोठा फटका बसला आहे. अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून रविवारी (ता. 18) पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांसाठी मदत वितरीत करण्यात आली. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाखांचा धनादेश देण्यात आला. दरम्यान, राज्यात पुरामुळे किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज अद्याप आलेला नाही. पुरामुळे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारची निश्चितपणे मदत लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मागितली असून तत्पूर्वी, राज्यातील एकूण नुकसानीची माहिती घेऊन नुकसानग्रस्तांना मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलो असून कोणतीही घोषणा करण्यासाठी आलेलो नाही. बळीराजाच्या डोळ्यात दु:खाचे अश्रू असून ते पुसण्याचा प्रयत्न सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
केंद्र सरकार हे परदेशातील नसून तेही आपलेच
केंद्र सरकार हे आपलेच असून नैसर्गिक आपत्तीच्या काळात राज्यांना मदत करण्याचे काम आजवर झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागण्यात काही गैर नाही. विरोधकांनी कोणतेही राजकारण त्यात आणू नये, मदतीसाठी सर्वांनी एकत्रित यायला हवे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोलापुरात व्यक्त केली. राज्यातील अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती दररोज संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून घेतली होती. दरम्यान, अतिवृष्टीचे संकट अद्याप संपलेले नसून कोणाचीही जिवितहानी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आणखी दोन दिवस मी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.